Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

विरोधकांना दिलीप वळसे पाटील यांना भ्रष्टाचारात दोषी ठरवायला अजून दहा जन्म घ्यावे लागतील

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने आठ वेळा देश पातळीवरील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार मिळवून देशात नावलौकिक मिळवला असताना विरोधक ऊठसुठ कोणत्याही प्रकरणात दिलीप वळसे पाटलांना भ्रष्टाचारात दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे मी ठामपणे सांगतो कि मला दोषी ठरवायला अजुन दहा जन्म घ्यावे लागतील असा इशारा देवदत्त निकम यांचे नाव न घेता माजी सहकार मंत्री दिलीप वळसे यांनी दिली.

पारगाव, ता. आंबेगाव येथे आज सोमवारी भीमाशंकर साखर कारखान्याची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे संस्थापक ब सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी श्री. वळसे पाटील बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, अनुसया पतसंस्थेच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या सदस्या पुर्वा वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य विष्णु काका हिंगे, सुषमा शिंदे व कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.

बाळासाहेब बेंडे प्रस्ताविक करताना म्हणाले कारखान्याने मागील वर्षी आठ लाख 83 हजार मेट्रिक टनाचे गाळप करुन सरासरी 11.89 टक्के साखर उताऱ्याने नऊ लाख 27 हजार 197 क्विंटल साखरेचे उत्पादन केले शेतकऱ्यांना प्रतिटन 3500 रुपये बाजारभाव दिला आहे चालु गाळप हंगामासाठी 10 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्टे ठेवले आहे.

कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी अहवाल वाचन केले विषयांचे वाचन सुरु असतानाच कारखान्याचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी काही विषय उपस्थित करत मागील हंगामात प्रतिटन 50 रुपये कपातीस आक्रमक पणे विरोध केला, शिवसेना नेते अरुण गिरे यांनीही कपातीस विरोध दर्शवीला.

दिलीप वळसे पाटील पुढे बोलताना म्हणाले, मी शांतपणाने सभासदांचे म्हणणे ऐकून घेतले. देवदत्त निकम यांचे काही विषय मांडले त्याचे उत्तर देणार आहे. लांबुन ऊस आणायचा का नाही? हे संचालक मंडळ ठरवेल. देवदत्त निकम यांनी याचा संबंध पराग साखर कारखान्यासी जोडू नये.

परागच्या जमीन खरेदीला निकम होते. पराग सुरु झाला नसता तर ऊस शिल्लक राहिला असता. घसारा कमी दाखवल्यामुळे आपण 3500 रुपये बाजारभाव देऊ शकलो नाहीतर एफआरपी 3272 येते त्या पेक्षा फक्त 80 रुपये जास्त देऊ शकलो असतो.

खोडव्याला आपण 3600 रुपये बाजारभाव दिला इतर कारखाने सभासद व बिगरसभासद असा भेदभाव करतात भीमाशंकर सर्वांना एकसारखा भाव देतो कारखाना लवकरच सीबीजी प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे जादा दर देता येणार आहे. कारखाना व वसंतदादा शुगर एन्स्टिट्युट अनुदानावर शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान देणार आहे त्यातून ऊस उत्पादनात दुप्पट वाढ होणार आहे.

भीमाशंकर कारखाना चांगला चालला असताना शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार नसताना देवदत्त निकम भीमाशंकर कारखान्याला बदनाम करत आहे. देवदत्त निकम यांना मीच कारखान्याचे संचालक केले व अध्यक्ष ही केले लोकसभेची उमेदवारीही दिली होती. ते अध्यक्ष असतानाच भाग विकास निधी कपात करायला सुरुवात केली तेव्हा कपातीला आक्षेप नव्हता आताच विरोध का मी जर बोलायला सुरुवात केल्यास तुम्हाला पळताभुई थोडी होईल असा इशारा निकम यांचे नाव न घेता श्री वळसे पाटील यांनी दिला.

सर्व विषय एकमताने मंजूर करत भागविकास निधीचा विषय हात वर करुन आवाजी मतदानाने मंजूर झाला असल्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी जाहीर केल्यानंतर सभा संपताच देवदत्त निकम व त्यांच्या समर्थकांनी विषय नामंजूर म्हणत घोषणा दिल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यास घोषणा देऊन प्रतिउत्तर दिले. यावेळी काही वेळ गोंधळ उडाला देवदत्त निकम व अरुण गिरे आणी त्यांच्या समर्थकानी सभा गुंडाळल्याचा आरोप करत निषेध म्हणुन कारखान्याच्या गेटवर काही वेळ ठिय्या आंदोलन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *