कुंभमेळ्यावर खर्च होणारा पैसा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरा, राऊतांचा सरकारला सल्ला

मुंबई : राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा मोठा खंड पडला असून, काही भागांत 40 दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याचे प्रशासनाच्या आढाव्यात समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे.
तर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी सुद्धा हीच मागणी लावून धरली आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला. कुंभमेळ्यावर खर्च होणारा पैसा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरा. यामुले देव काही रागवणार नाही, असा सल्ला राऊतांनी सरकारला दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (22 सप्टेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळावर भाष्य करत राज्य सरकारला सल्ला देत म्हटले की, कर्नाटक सरकारने दिल्लीच्या पथकाची वाट न पाहता, केंद्राची परवानगी न घेता दुष्काळ जाहीर केला आणि शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना जाहीर केल्या. कर्नाटकाचे मुख्यमंत्री स्वत: दुष्काळाचे मॉनिटरिंग करत आहेत. महाराष्ट्रात अजून तीन पक्षाचा समन्वय नाही. कॅबिनेटमध्ये चर्चा होत नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश मंत्रालयाच्या भिंती फाडून आत जात नाही. शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि मंत्रालयावर धडकेल अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून ब्र काढला जात नाही, असे संजय राऊत म्हणाले.
तसेच, कुंभमेळ्याचा खर्च कमी करा. कुंभमेळ्यासाठी 55 ते 60 हजार कोटींची गरज नाही. हे सर्व पैसे नाही तरी ठेकेदारांच्या घशात घालत आहात. दुष्काळ सुल्तानी संकट असेल तर आपण त्यात देवालाही सामिल करू. जेवढा आवश्यक आहे, तेवढाच खर्च कुंभमेळ्यासाठी करा. बाकीचे 30 ते 35 हजार कोटी दुष्काळ ग्रस्तांसाठी वळवा. शक्तीपीठाचा खर्च थांबवा. तोही खर्च ठेकेदारांचं धन होण्यासाठी आहे. देव अजिबात रागावणार नाही. देव अजिबात संतापणार नाही. याची गॅरंटी आम्ही देतो. नाही तरी देवाच्या नावावर ते पैसे गुजरातचे ठेकेदार खाणार आहेत किंवा शिंदेंची लोक खाणार आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने काही कार्यक्रम सुरू आहेत. दिवे लावण्याचे काम थांबवावे. तो शेकडो कोटीचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरा, अशी मागणीही संजय राऊतांनी केली आहे.
तर, कॅबिनेटमध्ये दुष्काळावर चर्चा होईल असे वाटत नाही. मंत्री बाहेर येऊन जे सांगतात तेच खरे. आत काय कोण सांगते हे कळत नाही. दुष्काळावर कॅबिनेट होणार असेल त्यात दुष्काळ हा चर्चेचा विषय असायला हवा. त्याचे लाइव्ह टेलिकास्ट व्हायला पाहिजे. जनतेला कळले पाहिजे काय चर्चा झाली. फक्त दुष्काळावरच कॅबिनेट व्हावी. त्याचे लाइव्ह चित्रण व्हायला हवे. ते सर्व चॅनलच्या माध्यमातून व्हावे. मंत्रालय किंवा सह्याद्रीमध्ये ही बैठक होऊ नये. स्टेडियमसारख्या लहानश्या जागेत कॅबिनेट घ्या. पत्रकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना तिथे बसण्यासाठी जागा द्या. सर्वांसमोरच चर्चा होऊ द्या, अशी महत्त्वाची मागणी सुद्धा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या या मागणीवर भाजप नेतेमंडळींकडून काय उत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



