
राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठराविक नियम व निकष असले, तरी केवळ दुष्काळ जाहीर करणे ही औपचारिकता असून शेतकऱ्यांना
थेट मदत करणे, ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे, असे मत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी सोमवारी पुण्यातील कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, राज्यात अनेक ठिकाणी ३५ ते ४० दिवस पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेत हिरवे दिसत असले, तरी शेतकऱ्यांच्या हाती पीक येईल, अशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे शासनाने परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक असल्याचे मुंडे म्हणाल्या.
दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही नियम आणि निकष निश्चित करण्यात आले आहेत. कृषिमंत्री तसेच अन्य मंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या पाहणीनंतर निकषांनुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल. यापूर्वीही सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीसह विविध प्रकारची मदत केली असून, या संकटातही राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असे मुंडे यांनी सांगितले.
सर्वच सण इतरांना त्रास होणार नाही असे साजरे करावेत
केवळ गणेशोत्सवच नव्हे, तर सर्वच सण इतरांना त्रास होणार नाही आणि पर्यावरणाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने साजरे झाले पाहिजेत, असे आवाहन मुंडे यांनी केले.
‘शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. यापुढेही शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.



