Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

पंतप्रधान कार्यालयाच्या बनावट ओळखपत्राद्वारे घुसखोरीचे प्रकरण: अटकेतील दोघांनाही जामीन

वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात बंदूक आणि पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) बनावट ओळखपत्र घेऊन बळजबरीने प्रवेश केल्याच्या आरोपाप्रकरणी अटक केलेल्या दोघांना कनिष्ठ न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एस. खेडेकर यांनी मुख्य आरोपी रोहन पारीख आणि त्याचा सहकारी दिलीप कुंडे यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या रोख मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ येथे ७ स्पटेंबर रोजी ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ साठी शेजारीच असलेल्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रा’ला भेट देणार होते, त्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडली. मॉलमध्ये प्रवेश करताना सुरक्षा रक्षकांना कुंडे याच्याकडे बंदूक आढळून आल्याने त्याला अडवण्यात आले. त्यानंतर, पारीख आणि कुंडे या दोघांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने आपण पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचा दावा करून ओळखपत्रही दाखवले होते.

पारीख वैयक्तिक कारणास्तव मॉलमध्ये गेला होता आणि त्याला कोणत्याही अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या भेटीबद्दल किंवा नव्याने लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांबद्दल कोणतीही कल्पना नव्हती, असा युक्तिवाद त्याच्यातर्फे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला. मूळात, हा तात्रिक स्वरूपाचा गुन्हा असून त्यात कोणत्याही व्यक्तीला इजा किंवा हानी पोहोचलेली नाही. पारीख हा विद्यार्थी ते व्यावसायिक अशा स्थित्यंतराच्या टप्प्यावर असून त्याला दीर्घकाळ कोठडीत ठेवल्यास त्याच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तसेच त्याच्या नुकत्याच सुरू झालेले करिअरही धोक्यात येऊ शकते, असाही दावा देखील मानेशिंदे यांनी पारीख याला जामीन मंजूर करण्याची मागणी करताना केला. दुसरीकडे, पारीख याच्या घराची तपासणी करताना चॅटजीपीटीचा वापर करून तयार केलेली पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित अनेक बनावट कागदपत्रे सापडल्याचा दावा पोलिसांनी केला व पारीख आणि कुंडे यांना जामीन देण्यास विरोध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *