फडणवीसांच्या खाजगी सचिवांनी आमदार पत्नीचा विरोधकच संपवला; भाजप प्रवेशानंतर माजी आमदार लगेचच राजकीय निवृत्ती घेणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले आणि भाजप आमदार श्वेता महाले यांचे कट्टर राजकीय विरोधक काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.
रविवारी (२० सप्टेंबर) बोंद्रे यांनी स्वतः फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून २२ सप्टेंबर रोजी भाजप प्रवेश होणार असल्याचे सांगितले. मात्र या प्रवेशानंतर बोंद्रे थेट राजकीय निवृत्ती घेणार असल्याची माहिती आहे.
बोंद्रेंचा भाजप प्रवेश निश्चित :
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची 2024 च्या विधानसभा निवडणुकीपासूनच चर्चा सुरू होती. गत दोन वर्षांमध्ये भाजपच्याच काही नेत्यांकडूनही त्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न झाले होते. मात्र या पक्षप्रवेशाच्या चर्चांना प्रत्यक्ष प्रवेशाचे स्वरूप आले नव्हते. यामागे महाले दाम्पत्याचा कडाडून विरोध कारणीभूत होता.
बोंद्रे आणि महाले हे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. विधानसभा निवडणुकीत बोंद्रेंना दोन वेळा पराभूत करत श्वेता महाले यांनी चिखलीच्या राजकारणात आपले स्थान मजबूत केले आहे. निवडून आल्यानंतरही महाले यांनी बोंद्रे यांच्या अनुराधा कॉलेज संदर्भातील जमिनीच्या व्यवहारांवरून आरोप केले होते. त्यावरून बोंद्रे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता.
एकदा बोंद्रे विधिमंडळ आवारात दिसताच महालेंचा पारा चढला होता. त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांकडे ‘एक गुन्हेगार’ विधिमंडळ आवारात फिरतो, अशी तक्रार केली होती. याच मतभेदांमुळे बोंद्रेंच्या भाजपप्रवेशाला महाले दाम्पत्याचा विरोध होता. मात्र शैक्षणिक, सहकारी संस्थांना राजकीय वरदहस्त आणि शासकीय अभय मिळावे यासाठी त्यांनी भाजप प्रवेशासाठी हालचाली वाढवल्या होत्या.
महालेंचीच घेतली मदत
राहुल बोंद्रे यांनी भाजपप्रवेश निश्चित करण्यासाठी विद्याधर महाले आणि श्वेता महालेंचीच मदत घेतल्याची माहिती आहे. महालेंच्याच मध्यस्थीने भाजपचे वरिष्ठ नेते आणि राहुल बोंद्रे यांची दोन ते तीनवेळा भेट झाली. या भेटीमध्ये बोंद्रे यांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब झाला. शिवाय त्यांच्या शैक्षणिक, सहकारी संस्थांना राजकीय वरदहस्त आणि शासकीय अभय देण्याचा शब्द बोंद्रे यांना मिळाला.
बदल्यात महाले यांनी बोंद्रेंकडून चिखलीत राजकीयदृष्ट्या सक्रिय न राहण्याचा शब्द घेतल्याची माहिती आहे. भविष्यात मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये एखादा नवीन मतदारसंघ तयार झाल्यात तिथे बोंद्रे यांना अॅडजस्ट करता येईल. पण सध्यातरी त्यांनी चिखलीत कुठच्याही पद्धतीने राजकीय लक्ष घालायचे नाही, त्यांनी राजकीय निवृत्तीच घ्यायची असेच ठरले असल्याची माहिती आहे.



