
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुचिका तरियाल हिने मिक्स मार्शल आर्ट्स प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदकाची कमाई केली आहे. सोमवारी पार पडलेल्या महिलांच्या ट्रॅडिशनल ६० किलो वजन गटातील उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत सुचिकाचा सामना सिंगापूरच्या हुई हून तेओ हिच्याशी झाला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यातील एक्स्ट्रा राऊंडमध्ये सुचिकाला सिंगापूरच्या खेळाडूकडून ०-२ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासोबतच सुचिकाचे सुवर्णपदकाचे स्वप्न अपूर्ण राहिले, तरीही तिने भारतासाठी कांस्यपदक निश्चित केले. सुचिकाच्या या यशामुळे भारतीय क्रीडा जगतातून आणि चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे ५०३ खेळाडू (२६९ पुरुष आणि २३४ महिला) सहभागी झाले असून, ते ३४ विविध खेळ प्रकारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत.भारतीय पथकात सर्वाधिक ७४ खेळाडू ॲथलेटिक्स आहेत. त्यामुळे ट्रॅक अँड फील्ड स्पर्धांमध्ये भारताला मोठ्या पदकांची आशा आहे. हॉकीमध्ये ४० खेळाडूंचा समावेश असून, क्रिकेट आणि शूटिंग या खेळांसाठी प्रत्येकी ३० खेळाडू सहभागी झाले आहेत. कबड्डीसाठी २४ खेळाडूंची टीम मैदानात उतरली आहे.
दरम्यान, २०२२ च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ६६१ खेळाडूंचे पथक पाठवले. त्या तुलनेत यंदाचे भारतीय पथक छोटे आहे. मात्र, हांगझोऊमध्ये भारताने १०६ पदके जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. यंदाही भारतीय खेळाडू तीच लय कायम ठेवत देशासाठी अधिक पदके जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत.



