समृध्दीसह इतर महामार्गांवर नियम मोडलात तर.महामार्ग सुरक्षा पथकातील १, १०१ कर्मचाऱ्यांना मुदतवाढ

समृद्धी महामार्गावर अलीकडे नाशिक जिल्ह्यात झालेली लुटमार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि राज्यातील इतर प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर होणारे अपघात, बेदरकारपणे वाहन चालविणे, नियमांचे पालन न करता एका मार्गिकेतून दुसऱ्या मार्गिकेत वाहन टाकणे, अतिवेग, वाहन चालविताना दाखविण्यात येणारा निष्काळजीपणा, हे सर्व थांबविण्यासाठी तसेच या प्रकारांवर अटकाव आणण्यासाठी आता उपाययोजना करण्यात येणार आहे.
त्यानुसार महामार्ग सुरक्षा पथकातील १,१०१ कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या मुदतवाढीचा उपयोग राज्यातील महामार्गांवर २४ तास पोलीस दल सक्रिय ठेवण्यास होणार आहे. समृध्दीसह राज्यातून जाणाऱ्या इतर सर्वच महामार्गांवरील वाहतूक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.
.
काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर वाहनधारकांना लुटण्याचे तीन ते चार प्रकार घडले. पोलिसांनी शिताफीने तपास करुन लुटारुंना ताब्यात घेतले असले तरी, या घटनांमुळे समृध्दीसारख्या महामार्गावरील प्रवास जर इतका धोकादायक असेल तर इतर मार्गांवरील प्रवासाचे विचारुच नका, असा प्रचार झाला. जिल्हा पोलिसांनी आपल्या कक्षातील समृध्दी महामार्गावर पुन्हा अशा घटना होऊ नयेत, यासाठी तातडीने काही उपाय योजले. राज्यातील महामार्गांवरील प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी इतरही काही उपाय करण्यात येत आहेत. महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमध्ये अतिवेग आणि चुकीच्या पद्धतीने इतर वाहनांपुढे जाण्याचा प्रयत्न करणे (ओव्हरटेक), एका मार्गिकेतून दुसऱ्या मार्गिकेत जाणे, ही मुख्य कारणे आहेत.
महामार्ग सुरक्षा पथकातील ज्या १,१०१ कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. त्यात केवळ अधिकारीच नव्हे, तर शेकडो हवालदार, पोलीस शिपाई आणि चालक यांचाही समावेश आहे. यामुळे स्पीड गन आणि आधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणेसह पोलीस पथके महामार्गांवर सातत्याने गस्त घालू शकतील. नाशिक-पुणे, मुंबई-नाशिक गुजरात, दिव-दमण या मार्गांसह खंडाळा, बोरघाट आणि राज्यातील अन्य धोकादायक वळणांवर अपघातांची शक्यता अधिक असते. त्यामुळे बोरघाट आणि चिंचोटी भागातील क्रेन चालक तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या पदांचाही समावेश आहे.
अपघात घडल्यास, महामार्गावर एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास इतर वाहनांना खोळंबा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघातग्रस्त किंवा नादुरुस्त वाहन त्वरीत बाजूला करण्यासाठी आणि जखमींना वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी या पथकाचा फायदा होणार आहे. सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यात वेगवेगळे सणोत्सव येत असल्याने या कालावधीत महामार्गांवरील वाहतूकीत मोठी वाढ होते. मुदतवाढ मिळालेल्या १,१०१ कर्मचाऱ्यांमुळे सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी नियंत्रण आणि सुरक्षेचे नियोजन अधिक सक्षमपणे करता येणे शक्य होणार आहे. महामार्ग सुरक्षा पथकातील १,१०१ कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मंजूर करण्यात आलेल्यात नाशिक जिल्ह्यातील १०९ जणांचा समावेश आहे. शासनाचा हा निर्णय आगामी सणासुदीच्या काळात महामार्गांवरील सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरु शकेल.
नाशिकसह ग्रामीण भागातील महामार्गांवर गस्त
नाशिक (ग्रामीण), अहिल्यानगर, धुळे, जळगाव, पुणे (ग्रामीण), ठाणे आणि रायगड या महत्त्वाच्या जिल्ह्यांतील महामार्ग सुरक्षा केंद्रांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. नाशिक ग्रामीण अंतर्गत १०९ पदे, पुणे ग्रामीण ११५ पदे तर ठाणे ग्रामीण १७१ पदे या निर्णयामुळे सक्रिय राहणार आहेत.



