शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! चार लाख शेत-पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग; ‘महापाणंद ग्रीड’ उभारणार

राज्यातील शेतकऱ्यांना शेतजमिनीपर्यंत बारमाही दळणवळणाची सुविधा देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळिराजा शेत-पाणंद रस्ते योजना- शेत सेतू : महापाणंद गतिशक्ती’ अभियानाला राज्य सरकारने सुरुवात केली आहे.
या अभियानातून राज्यातील सुमारे चार लाख शेत आणि पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रीड’ उभारण्यात येणार आहे.
राज्य सरकारने शेत आणि पाणंद रस्ते खुले करण्यासाठी ‘इंटेलिजेंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयडब्ल्यूएमएस) कार्यान्वित केली आहे. उपग्रह प्रतिमा आणि डिजिटल नकाशांच्या सहाय्याने रस्त्यांचे भौगोलिक स्थान निश्चित केले असून, प्रकल्पाचे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता आणि ई-बिलिंगपर्यंतची सर्व प्रक्रिया प्रणालीतून पार पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे सुलभ होईल.
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक ग्रामपंचायतीतून किमान दोन रस्त्यांची निवड केली जाईल. यात एका अतितातडीच्या रस्त्याचा समावेश असेल. ग्रामस्थांच्या उपस्थितीत माहिती संकलित करून भूमी अभिलेख विभागामार्फत विनाशुल्क सीमांकन केले जाईल. रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी तहसीलदारांवर असेल.
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम राबविली जात आहे. पहिल्या टप्प्यात जनजागृती आणि रस्ते निवडीनंतर २३ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरदरम्यान विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती पात्र रस्त्यांना मान्यता देईल. जिल्हाधिकारी या कामाचा आढावा घेतील. ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत २८ हजार ग्रामपंचायतींमधील ५० हजार रस्त्यांचे काम प्राधान्याने करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे.



