Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

चंद्रकांत पाटलांवरील टीकेने संतोष पंडित तुरुंगात, जामीन मिळताच रविंद्र धंगेकरांकडून सत्कार, चर्चांना उधाण

पुण्यातील युट्युबर संतोष पंडित यांची काही दिवसांपूर्वी जामीनावर सुटका झाली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना वापरलेल्या असंसदीय शब्दामुळे संतोष पंडित अडचणीत सापडले होते.

संतोष पंडित यांना रात्री एक वाजता घरातून उचललं होतं. पोलिसांकडून रात्री अटक करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वत:च्या कानावरही अनेक चापट मारल्या होत्या. त्यांच्या अटकेचे पडसाद देशभर उमटले होते. आता जामिनावर बाहेर आलेल्या संतोष पंडित यांचा सत्कार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

पुण्यात शिंदे गटाचे नेते, माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजप नेते, चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप अनेकदा पाहिले असतील. रवींद्र धंगेकर यांनी अनेकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांचे निकटवर्तीय समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गंभीर आरोपानंतर समीर पाटील यांनी मानहाणीचा दावा ठोकला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यातील वाद सर्वश्रूत आहे. आता रवींद्र धंगेकर यांनी आणखी एक कृतीतून मंत्री चंद्रकांत पाटील यांना डिवचलं आहे.

संतोष पंडित यांना 3 सप्टेंबरला झाली होती अटक

युट्युबर संतोष पंडित यांच्यावर मंत्री चंद्रकांत पाटील आणि एका महिला नगरसेविकेबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह वक्तव्ये आणि व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. यानंतर एका महिलेने संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणी संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री 1 वाजता अटक केली होती. त्यानंतर पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने तपासासाठी पुढील कोठडीची आवश्यकता नसल्याचे मुद्दे मांडले होते. तर सरकारी पक्षाने साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचे सांगत जामिनाला विरोध केला होता. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. त्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *