मॉन्सूनच्या परतीला सुरुवात, महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; IMD चा या जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती. अशामध्ये, भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला. राज्यामध्ये सध्या उन्हाचा चटका वाढत असतानाच वादळी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.
सोमवारी (21 सप्टेंबर) राज्यातील अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील 72 तास मुसळधार पाऊस कोसळणार असून भारतीय हवामान विभागाने 22 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मुसळाधार पासावाचा इशारा दिला आहे. Maharashtra weather update
या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर, तसेच विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. उर्वरित राज्यामध्येही ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. काही ठिकाणी कमी कालावधीत अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्येच पुन्हा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. पश्चिम राजस्थानमधील मॉन्सूनच्या माघारीची सीमा सध्या कायम आहे. पुढील दोन दिवसांत आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर अंदमान समुद्र आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. वायव्येकडे सरकत असलेली ही प्रणाली सोमवारी अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.



