लालबागच्या राजा’च्या इथे चालणारी एक गोष्ट मुंबईतल्या डब्बेवाल्यांना नाही पटली, त्यांच्या संघटनेचा स्पष्टपणे विरोध

गणेशोत्सवाच्या कालावधीत किमान एकदातरी लालबागच्या राजाचं दर्शन व्हावं अशी प्रत्येक गणेश भक्ताची इच्छा असते. या अकरादिवसात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी उसळते. दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात.
काही मनातली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी, तर काही नवस फेडण्यासाठी म्हणून येतात. कारण लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो. गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाचं दर्शन सहज होत नाही. भाविकांना तासन तास रांगेत थांबावं लागतं. अगदी व्हीआयपी दर्शनही सहजतेने मिळत नाही. पण व्हीआयपीना विशेष वागणूक मिळते. ही तिथे रांगते उभं असलेल्यांना सहज दिसून येतं. हीच बाब मुंबईतल्या डबेवाल्यांना पटलेली नाही.
त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी प्रगट करत मुंबईतील डबेवाल्यांनी लालबागच्या राजाच्या व्हीआयपी दर्शनाला विरोध केला आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सामान्य नागरिकांना तासनतास ताटकळत ठेवतात. मात्र अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना विशेष वागणूक दिली जात असल्याने मुंबई डबेवाला असोसिएशनने ‘व्हीआयपी’ दर्शनाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
डबेवाला संघटनेची मागणी काय?
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सामान्य नागरिक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) मंडळाकडून वेगवेगळ्या रांगा लावल्या जातात. दर्शन व्यवस्थेतील या भेदभावामुळे सामान्य नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते असं डबेवाल्याचं म्हणणं आहे. दरम्यान, सामान्य नागरिकांना आदरपूर्वक दर्शन मिळत नसल्याने डबेवाला संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. गर्दी नियोजनचा अभाव, व्हीआयपी दर्शन व्यवस्था आदी मुद्दे उपस्थित करत व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे.
मुंबईतील लालबागच्या राजाच्या जलद दर्शनाचे आमिष दाखवून भाविकांची फसवणूक
मुंबईतील लालबागच्या राजाच्या जलद दर्शनाचे आमिष दाखवून 18 वर्षीय मुलाने चार भाविकांची 3,400 रुपयांना फसवणूक केली. मुंबईच्या काळाचौकी पोलिसांनी 18 वर्षीय प्रणव सुरेशकुमार यादव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने लालबागच्या राजाच्या जलद चरणस्पर्श दर्शनाचे आमिष दाखवून चार भक्तांची 3,400 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. काळाचौकी पोलिसांनी बीएनएस कलम 318 (4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी परळ येथे राहणारा आहे. तक्रारदार आणि त्याच्या मित्रांनी कथितरित्या ऑनलाइन पेमेंट स्कॅनरद्वारे 800 रुपये भरले आणि उर्वरित 2,600 रुपये रोख दिले. मात्र त्यानंतर यादव आवश्यक ती व्यवस्था करेन असं सांगून तो घटनास्थळावरून निघून गेला.



