गणरायाच्या चरणस्पर्शांने उजळणार दुर्गम भागातील शाळा! टिळक रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम

पुणे : यंदा ९७ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ‘टिळक रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने एक अनोखा देखावा केला असून, श्रींच्या पूजेच्या मूर्तीसमोर एक विशेष ‘सौर मंडळ’ आणि डिजिटल ऊर्जा पॅनेल तयार करण्यात आले आहे.
‘पॉइंट्स’च्या आधारावर १०० पेक्षा जास्त ‘सोलर पॅनेल’ सातारा जिल्ह्यातील तापोळा परिसरातील दुर्गम खेड्यांमध्ये दान करण्यात येणार आहेत. गणरायाच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाद्वारे गणरायाला होणाऱ्या चरणस्पर्शाच्या माध्यमातून दुर्गम भागातील अंधारमय शाळा आणि मंदिरे उजळण्याचा संकल्प मंडळाचा आहे.
मंडळाचे अध्यक्ष आदित्य राजेंद्र ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘यंदा मंडळाने ‘विक्रम सोलर’ यांच्या सहकार्याने हा उपक्रम साकारला. श्रींच्या पूजेच्या मूर्तीसमोर एक विशेष ‘सौरमंडळ’ आणि ‘डिजिटल ऊर्जा पॅनेल’ तयार करण्यात आले. भाविकांनी गणरायाच्या श्री चरणांवर हात ठेवून दर्शन घेतले, की प्रत्येक चरणस्पर्शाची नोंद एक ‘पॉइंट’ म्हणून केली जाते. दर १०० पॉइंट्समागे (अर्थात १०० भाविकांच्या दर्शनानंतर) एक सोलर पॅनेल मोफत देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. १० दिवसांत १०,००० हून अधिक पॉइंट्स जमा करून १०० पेक्षा जास्त सोलर पॅनेल्स दान करण्याचे मंडळाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत पाच हजार भाविकांनी चरणस्पर्श केला.
‘हा अनोखा उपक्रम राबवण्यासाठी मंडळ गेले महिनाभर तयारी करीत होते. यासाठी खास डिजिटल ऊर्जा असणारे गणरायांचे चरणस्पर्श बनवण्यात आले. याच्या काही चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर या पादुका भाविकांना दर्शनासाठी श्रींच्या मूर्तीजवळ ठेवण्यात आल्या,’ अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. याखेरीज, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना स्वतःच्या घरात सौर ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ‘विक्रम सोलर’तर्फे ५,००० चे सवलत कूपनही दिले जात आहे.
सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागांना वीज
हे सौर उर्जेंचे पॅनेल्स केवळ दान करून मंडळ थांबणार नाही, तर सातारा जिल्ह्यातील तापोळा परिसरातील ज्या दुर्गम खेड्यांमध्ये किंवा शाळांमध्ये वारंवार वीज जाते, भारनियमनाचा त्रास होतो अथवा वीजच उपलब्ध नाही, तिथे जाऊन पूर्ण यंत्रणा उभारून वीज सुरू करून दिली जाणार आहे.
मराठी कलाकाराला आगळीवेगळी श्रद्धांजली
सामाजिक उपक्रमासोबतच मंडळाने यंदाचे देखाव्याचे स्वरूपही वेगळे ठेवले आहे. दिग्गज मराठी अभिनेते कै. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जीवनपटावर आधारित देखावा उभारून कलाकाराला अनोखी आदरांजली वाहिली आहे. त्याचबरोबर मंडळातील गणरायाच्या दर्शनाला कोणी मान्यवर आल्यास त्यांना शाल, पुष्पगुच्छ न देता वही आणि डायरी दिली जात आहे अशी माहिती मंडळाने दिली.



