Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

जुनी पेन्शन योजनेसाठी 12 डिसेंबरला दिल्लीत हुंकार! रामलीला मैदानावर धडकणार लाखो कर्मचारी

जुनी पेन्शन योजना लागू करावी, एनपीएस व यूपीएस रद्द कराव्यात, कंत्राटी व आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना नियमित करावे, आठवा वेतन आयोगाच्या कर्मचारी हिताच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मागण्यांसाठी दि. १२ डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर राष्ट्रीय कर्मचारी महारॅली आयोजित केली आहे.

या रॅलीत देशभरातील कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांनी दिली. केंद्र व राज्य सरकारांकडून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत चिलबुले यांनी सांगितले की, देशातील लाखो कर्मचारी आता आपल्या मागण्यांसाठी निर्णायक लढ्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाकडून या रॅलीचे आयोजन केले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासोबतच पीएफआरडीए कायदा, एनपीएस आणि यूपीएस रद्द कराव्यात अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. सर्व प्रकारचे कंत्राटी, ठेका, आउटसोर्सिंग आणि दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घ्यावे, अशीही मागणी केली आहे.

देशभरातील सरकारी विभागांमधील सुमारे ९.७ लाख आणि राज्यातील सुमारे २.५ लाख रिक्त पदांवर नियमित भरती करावी, तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि वाहनचालकांच्या भरतीवरील निर्बंध हटवावेत, अशी मागणी महासंघाने केली आहे.

सरकारी शाळा बंद करू नयेत तसेच शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) सक्ती रद्द करावी, अशी मागणीही केली आहे. यावेळी राज्य उपाध्यक्ष कैलासचंद्र वाघचौरे, राष्ट्रीय सदस्य संजय गिरी, प्रमोद ठाकरे, जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या ज्योती केदारे, महासंघ पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तयारीला वेग

दिल्लीतील राष्ट्रीय रॅलीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये समित्यांच्या बैठका, जिल्हास्तरीय कार्यकर्ता संमेलने आणि पत्रकार परिषदा घेणार आहेत. तसेच विविध विभागांमध्ये गेट मीटिंग आणि कर्मचारी संपर्क अभियान राबविणार आहे.

१५ ऑक्टोबरपर्यंत सर्व कार्यालये व शाळांमध्ये पोस्टर, बॅनर, होर्डिंग तसेच स्थानिक भाषेतील प्रचार साहित्य लावणार आहे. नोव्हेंबरमध्ये अभियान अधिक तीव्र करून दिल्लीतील रॅलीत मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी व्हावेत, यासाठी युद्धपातळीवर संपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याचे उमेशचंद्र चिलबुले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *