Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

हिंजवडीतील रस्ते प्रकल्पाचे काम १ डिसेंबरपासून होणार सुरू – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निर्देशानुसार हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसरातील रस्ते विकासाला आता वेग येणार असून १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या परिसरातील रस्ते पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, भूसंपादन आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. १७) उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. हिंजवडी आयटी कॉरिडॉरमधील दळणवळण सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सहा प्रमुख रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. भूसंपादन, रस्त्यांचे नियोजन आणि निविदा प्रक्रियेसाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आवश्यक जमिनीपैकी ६० ते ७० टक्के जमिनीचे संमतीने भूसंपादन करून आगाऊ ताबा १५ ऑक्टोबरपर्यंत घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर निविदा प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसरातील शेतकरी आणि जमीनमालकांसाठी प्रशासनाकडून गावपातळीवर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये भूसंपादन, हस्तांतरणीय विकास हक्क, दोन किलोमीटरच्या परिघातील निवासी वापरासंदर्भातील नियम तसेच जमीनमालकांना मिळणारे विविध लाभ याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

निवड करण्यात आलेल्या सहा रस्त्यांव्यतिरिक्त स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आणखी दोन मार्गांची व्यवहार्यता तपासण्यात येणार आहे. यामध्ये विप्रो चौकाजवळील रस्ते, पुनावळे-मारुंजी जोडरस्ता आणि कालव्यालगतच्या मार्गांचा समावेश आहे. रस्ते विकासासाठी सिंचन विभागाच्या अखत्यारीतील जमीन वापरण्याबाबतचा प्रस्ताव ३० सप्टेंबरपर्यंत तयार करून संबंधित कालवा मंडळाच्या मंजुरीसाठी सादर करण्याची अपेक्षा आहे.

सांडपाणी व्यवस्थापन, नदी प्रदूषणाचाही आढावा

हिंजवडी परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी प्रदूषणाच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. बांधकाम व्यावसायिक आणि आयटी कंपन्यांना सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करूनच त्याची विल्हेवाट लावण्याचे तसेच सांडपाणी नदीत सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. काही प्रमुख गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रांसाठी पीएमआरडीएकडून निविदा प्रक्रिया सुरू आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) कारवाई केली जाणार आहे.

भूमकर चौक, रावेतमधील वाहतूक कोंडीवर उपाय

भूमकर चौक, रावेत आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ते रुंदीकरण, खड्डे बुजवणे आणि वाहतुकीतील अडथळे दूर करण्यावर भर देण्यात येणार आहे. हलक्या वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधण्यात येणार असून डांबरीकरणाची कामेही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएशी संबंधित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांचा, तसेच रस्ते रुंदीकरणासाठी आवश्यक जमिनीच्या मोबदल्याचाही आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रश्न निश्चित कालमर्यादेत सोडविण्यासाठी विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले. या बैठकीला आमदार शंकर मांडेकर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *