केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

पुणे : केतन अगरवाल खून प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात शनिवारी पाच हजार ५३ पानी आरोपपत्र शनिवारी दाखल केले. खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे, तसेच परिस्थितीजन्य पुरावे आरोपपत्रासोबत जोडण्यात आले आहे.
केतन अगरवाल याचा १८ जून रोजी लोहगडावर किल्ल्यावरील दरीत ढकलून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात केतनची नियोजित पत्नी सिया प्रवीण गोयल, तिचा प्रियकर चेतन बाबूलाल चौधरी यांना अटक करण्यात आली. केतनबरोबर निश्चित करण्यात आलेला विवाह सियाला मान्य नव्हता. तिने प्रियकर चेतन याच्याशी संगनमत करुन खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. चेतनचा मित्र रितेश संजय हंगे याला कटाची माहिती होती.
आरोपी चेतनने त्याला ही माहिती दिली होती. संजय याला नुकतीच ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शनिवारी वडगाव मावळ न्यायालयात ग्रामीण पोलिसांनी खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया, तिचा प्रियकर चेतन, त्याचा मित्र संजय यांच्याविरुद्ध पाच हजार ५३ पानी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात मोबाइलमधील विदा (डाटा), समाज माध्यमातील संवाद, मोबाइलवरील संपर्क (काॅल डिटेल रिकाॅर्ड-सीडीआर), तांत्रिक तपासाबाबतचा अहवाल, तसेच साक्षीदारांचे जबाब, कागदपत्रांचा समावेश आहे.
शंभरहून अधिक साक्षीदारांचे जबाब
केतन अगरवाल खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी १०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. लोहगडावरील सिया आणि चेतन यांच्या संशयास्पद हालचाली साक्षीदारांनी पाहिल्या होत्या. महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
इंटरनेटवरुन माहिती
मार्च २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी भागातील एका २१ वर्षीय तरुणीचा लोहगडावरुन पडून मृत्यू झाला होता. याबाबतची माहिती सिया आणि चेतनने इंटरनेटवरुन घेतली होती. मध्य प्रदेशातील सोनम रघुवंशी हिने पती राजा यांचा प्रियकराच्या मदतीने मेघालय येथे खून केल्याची घटना घडली होती. या खून प्रकरणाची माहिती त्यांनी इंटरनेटवरुन घेतली होती. गुन्हेगारीवर बेतलेेले चित्रपट त्यांनी पाहिले होते. लोहगडावर केतनला बोलाविण्यासाठी सियाने ‘माही’या नावाने बनावट खाते उघडले होते. माही तिची मैत्रिण असल्याचे तिने केतनला भासिवले होते. माहीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिने केतनला लोहगडावरुन बोलावून घेतले होते, अशी माहिती पोलिसांनी आरोपपत्रात दिली आहे.
आरोपपत्रात काय ?
– केतनच्या हत्येसाठी लोणावळ्यातील विविध ठिकाणांची माहिती घेतली
– २१ मे रोजी लोणावळ्यातील टायगर पाॅईंट, दुर्गम भागांची पाहणी
– आरोपी चेतनचा मित्र संजय हंगे याचा खून प्रकरणात महत्वाचा सहभाग
– संजय हंगे याने चेतन आणि सियाला खून प्रकरणात मदत केली
– तीन आरोपींविरुद्ध भक्कम तांत्रिक पुरावे
– केतनला लोहगडावरुन ढकलून देण्यासाठी ३१ मे रोजी जागा निश्चित केली – प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब



