सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

मानवत : राज्य शासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आयुक्त तथा अभियान संचालक डॉ. सुनील भोकरे यांनी मानवत येथे भेट देत ग्रामीण रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्रे आणि विविध आरोग्य विभागांच्या कामकाजाची पाहणी केली.
मात्र या दौऱ्याची चर्चा आरोग्य सुविधांच्या आढाव्याबरोबरच सुट्टीच्या दिवशी झालेल्या तपासणीमुळेही रंगली. महालक्ष्मी सणाच्या तयारीत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना अचानक ड्युटीवर हजर राहावे लागल्याने त्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
डॉ. भोकरे यांनी शुक्रवारी (ता.१८) मानवत ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील विविध विभागांची पाहणी केली. रुग्णालयात उभारण्यात आलेल्या “आरोग्यदूत गणराया – निरोगी महाराष्ट्र” या देखाव्याचे त्यांनी अवलोकन केले. आरोग्य विभागाच्या विविध योजना आणि जनजागृतीचे प्रभावी सादरीकरण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
यानंतर त्यांनी शहरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (बौद्धवाडा परिसर), तलाव कट्टा येथील अर्बन हेल्थ सेंटर आणि पाळधी रोड येथील अर्बन हेल्थ सेंटर येथे भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली. केंद्रांमध्ये उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि आवश्यक सुधारणा याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
बौद्धवाडा येथील आपला दवाखाना येथे भेटीदरम्यान शिवसेना दलित आघाडीचे शहरप्रमुख आदर्श धबडगे यांनी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि आरोग्य केंद्रातील काही सुविधांच्या कमतरतेबाबत माहिती दिली. डॉ. भोकरे यांनी या बाबींची नोंद घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
दौऱ्यादरम्यान मानवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हुसेन शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रेहान शेख, रुग्ण कल्याण समिती सदस्य राणा संजय नाईक तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
“नागरी भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभाग यांच्यातील समन्वय वाढविण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा मिळण्यासाठी आवश्यक सुविधा, मनुष्यबळ आणि यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असे डॉ. भोकरे यांनी सांगितले.



