Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

दीपकेंचा मोर्चा धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याकडे, भर चौकात शेकडो एमपीएससी विद्यार्थ्यांची बैठक घेत दिला इशारा

नागपूर: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे राजीनामा घेतल्याशिवाय माघार नाही अशी त्यांची भूमिका आहे.

आता त्यांनी आपला मोर्चा एमपीएससीकडे वळवला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. अभिजीत दिपके यांनी नागपूरच्या सक्करदरा चौक येथे बैठक घेत एमपीएससी उमेदवारांशी संवाद साधताना आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले. त्यामुळे दिपकेंच्या राजीनाम्यानंतर खरच एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी का होत आहे

एमपीएससीमधील कथित गैरप्रकारांसह वाहनांच्या नवीन क्रमांकपट्ट्या, सीमा नाक्यांवरील टोलवसुली आदी मुद्द्यांचाही दिपके यांनी उल्लेख केला. भीमनवार यांच्याविरोधात यापूर्वी करण्यात आलेल्या आरोपांचा संदर्भ देत त्यांनी सोशल मीडियावर मोहीम राबवून अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. मात्र, या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून अथवा तपास यंत्रणांकडून दोष सिद्ध झाल्याची माहिती उपलब्ध नाही. एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी आयोगाने भरती प्रक्रिया रद्द केली आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून, त्यावरून विद्यार्थ्यांकडून अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

दीपके आंदोलन कधीपासून करणार

दरम्यान, भीमनवार यांनी संबंधित पेपरफुटीचा प्रकार आपण पदभार स्वीकारण्यापूर्वीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये अध्यक्षपदाची शपथ घेतली असून मार्चमध्ये पदभार स्वीकारला. संबंधित पेपरफुटीची घटना जानेवारीमध्ये घडली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, आरोप सिद्ध करणारा पुरावा दिल्यास पदावर राहणार नसल्याचेही भीमनवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील उमेदवारांशी संपर्क साधून एकाच ठिकाणी आंदोलन करण्याचे आवाहन दिपके यांनी केले.

२४ सप्टेंबर शेवटची तारीख

नागपूर, अमरावती किंवा छत्रपती संभाजीनगर यापैकी आंदोलनासाठी ठिकाण निश्चित करण्याबाबत चर्चा करण्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थ्यांनीच करावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. सोशल मीडियावर सक्रिय होऊन एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करणारे व्हिडीओ आणि विविध मोहिमा राबवण्याचे आवाहनही दिपके यांनी केले. २४ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास व्यापक आंदोलन करण्याचा इशारा CJPकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. “भीमनवार राजीनामा द्या”, अशा घोषणा देत दिपके यांनी विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *