
नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून नायगाव जिल्हा निर्माण करण्याची मागणी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी पुढे आल्यानंतर या प्रस्तावाला विविध तालुक्यांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मुखेडचे भाजपा आमदार डॉ. तुषार राठोड यांनी नांदेडचे विभाजन झाल्यास मुखेड जिल्हा निर्माण व्हावा, अशी भूमिका मांडली. नायगाव मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेश पवार यांनी मात्र सावध भूमिका घेत, जिल्हानिर्मितीची मागणी करणाऱ्या गटाशी सविस्तर चर्चा करण्याची तयारी दर्शविली.
नायगाव नांदेड शहरालगत असल्याने नव्या जिल्ह्याचे मुख्यालय तेथे करता येईल का, याचाही अभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रस्तावित नायगाव जिल्ह्यात कंधार, बिलोली, मुखेड आणि देगलूर या तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्यामुळे या भागातील आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या भूमिकांकडे लक्ष लागले आहे. बिलोली-देगलूरचे ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर आणि कंधार-लोहाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, नायगावच्या बैठकीला कोणकोणत्या तालुक्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.



