Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Amit Thackeray : आदित्य ठाकरे यांचा दिशा सालियान प्रकरणात सहभाग असू शकत नाही; अमित ठाकरेंकडून भावाची पाठराखण

दिशा सालियान प्रकरणामध्ये ठाकरेसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांचा कधीही सहभाग असू शकत नाही, असा ठाम विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.

माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी आपले मत मांडले.

या प्रकरणाकडे कसे पाहावे हे मला समजत नाही, पण एक भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की, आदित्य अशा कोणत्याही गोष्टीत कधीच सामील असू शकत नाहीत, अशी स्पष्टोक्ती अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) करताना एका भावाच्या नात्याने आदित्य ठाकरेंची बाजू सावरली.

राजकीय विरोधक जाणीवपूर्वक प्रतिमा मलीन करत असल्याचा आरोप आदित्य यांनी केला होता, ज्याला अमित ठाकरेंच्या वक्तव्याने दुजोरा मिळाला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी व्यवस्थापक असलेल्या २८ वर्षीय दिशा सालियन हिचा ८ जून २०२० रोजी मालाडमधील इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता.

सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढत, २ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले.

तसेच, सहा वर्षे उलटूनही एफआयआर न नोंदवल्याबद्दल मुंबई पोलिसांची कानउघाडणी केली आणि पोलिसांचा तपास उत्तरांपेक्षा अधिक प्रश्न निर्माण करणारा असल्याचे निरीक्षण नोंदवले. यानंतर सीबीआयने एफआयआर नोंदवला असून, यात कोणत्याही आरोपीचे नाव नमूद करण्यात आलेले नाही.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी सोशल मिडियावर पोस्ट करत आपण दिशाला कधीही ओळखत नव्हतो किंवा भेटलोही नव्हतो, असे स्पष्ट केले. गेल्या सहा वर्षांपासून राजकीय आणि वैयक्तिक हेतूने आपले चारित्र्यहनन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून, अशा द्वेषपूर्ण प्रचाराने आपण सत्यासाठीचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *