नसरापूर अत्याचार प्रकरणातील उत्कृष्ट अपराधसिद्धीचा गौरव; 9 अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कार

नसरापूर (ता. भोर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला मा. न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या गंभीर गुन्ह्याचा प्रभावी तपास, पुरावे संकलन आणि न्यायालयीन पाठपुरावा करत आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात राजगड पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.
या प्रकरणाची जुलै 2026 महिन्यातील महाराष्ट्रातील ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यानिमित्त 18 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना रिवॉर्डसह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
राजगड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3) तसेच पोक्सो कायद्यातील कलम 4, 6, 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपासादरम्यान महत्त्वाचे पुरावे संकलित करून न्यायालयीन प्रक्रिया प्रभावीपणे राबवली.
या कामगिरीत सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड आणि पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस उपनिरीक्षक संदीप संकपाळ, सहायक पोलीस फौजदार शंकर नवले, पोलीस हवालदार गणेश धनवे आणि नाना मदने यांनी रायटर म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच पोलीस उपनिरीक्षक विद्याधर ज्ञानदेव निचित यांनी न्यायालयीन पैरवी अधिकारी म्हणून प्रभावीपणे काम पाहिले. न्यायालयीन कामकाजादरम्यान त्यांनी बजावलेल्या जबाबदारीची विशेष दखल प्रशस्तीपत्रात घेण्यात आली आहे.
पोलीस शिपाई एम. एस. भगत यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून महत्त्वाचे पुरावे विकसित करण्यात भूमिका बजावली. गंभीर गुन्ह्यात प्रभावी तपास, पुराव्यांचे योग्य संकलन आणि न्यायालयीन पाठपुराव्याच्या माध्यमातून आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात आलेल्या कामगिरीबद्दल राजगड पोलिसांच्या या पथकाचा पोलीस महासंचालकांकडून गौरव करण्यात आला.



