
- ३१ टन वजनाचा विशाल शालिग्राम पाण्यात बुडाला
- सुमारे १७.५ कोटी वर्षे जुना जीवाश्म असल्याचे मानले जाते
- भाविकांना आता दुरूनच पूजा-अर्चा करून परतावे लागत आहे
नेपाळमधीलनद्यांचे प्रवाह बदलणे आणि पाण्याची पातळी वाढल्याचा परिणाम शतकानुशतके पूजल्या जाणाऱ्या विशाल शालिग्रामवर झाला आहे.
हिंदू धर्मीय लाखो भाविक ज्या पवित्र शिळेची पूजा करतात, ती पाण्यात बुडाली आहे. नेपाळमधील गुल्मी, स्यांग्जा आणि पर्वत या तीन जिल्ह्यांच्या संगमावर असलेल्या सेतीबेनी येथे ही शालिग्राम शिळा आहे. सेती नदीचा प्रवाह बदलल्याने ही पवित्र शिळा पाण्याखाली गेली आहे.
पावसाळ्यात कालीगंडकी नदीची पाणीपातळी वाढणे आणि सेती नदीचा प्रवाह बदलल्याने हे पवित्र स्थळ पाण्यात गेले आहे. त्यामुळे भाविकांना येथे पोहोचणे कठीण झाले आहे. नद्यांचे प्रवाह बदलणे आणि नदीपात्राच्या हद्दीत येणाऱ्या भागांमुळे स्थानिक प्रशासनावरही टीका होत आहे. ‘रायझिंग नेपाळ डेली’च्या वृत्तानुसार, आशियातील सर्वांत मोठ्या शालिग्राम शिळेचे संरक्षण करण्यात अपयश आल्याने अधिकाऱ्यांवर टीका होत आहे. भाविकांना आता दूरूनच पूजा-अचर्चा करून परतावे लागत असल्याने त्यांच्यात नाराजी आहे.
वजन तब्बल ३१ टन
नेपाळशी संबंधित हा सर्वांत मोठा शालिग्राम प्रत्यक्षात अॅमोनाइटचा एक विशाल नैसर्गिक जीवाश्म आहे. प्राचीन काळात जेव्हा हिमालयाच्या जागी तेथीस महासागर होता तेव्हा भूगर्भीय हालचालींमुळे नंतर तिथे हिमालय पर्वत निर्माण झाला. यामुळे सागरी जीव तिथेच दबले गेल्याचे म्हटले जाते ज्यांचे पुढे दगडात रुपांतर झाले. त्यामुळे शालिग्राम दगडांवर चक्रासारख्या नैसर्गिक आकृत्या दिसल्याचे सांगितले जाते. त्याचे वजन सुमारे ३१ टन असून, तो जगातील सर्वांत मोठा शालिग्राम मानला जातो. मुक्तिनाथ धामाजवळील पवित्र कालीगंडकी नदीच्या परिसरात सापडलेली ही विशाल शिळा सुमारे १७.५ कोटी वर्षे जुनी असल्याचे मानले जाते.



