
काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते.दरम्यान, आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
राज्यात नवरात्रीआधी मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिंदे गटाने रणनीती आखल्याची माहिती समोर येत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटातील आमदारांना आपल्या गटात आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील तब्बल १४ आमदारांना शिंदे यांच्या शिवसेनेत आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील या मंत्र्यांवर या कथित ‘ऑपरेशन टायगर’ची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे. यातील काही आमदारांना सरकारमध्ये चांगली खाती किंवा मंत्रिपदाची अपेक्षा असल्याची चर्चा आहे. तर काही आमदारांना महामंडळाचे अध्यक्षपद किंवा राज्यमंत्रीपद देण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटाला साथ दिल्याचा राजकीय संदर्भही या घडामोडींना जोडला जात आहे. आता आमदारही ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याच्या चर्चांमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर नवं राजकीय आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, या संभाव्य पक्षप्रवेशांबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठीही शिंदे गटाने फिल्डिंग लावल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीमध्ये महापौरपदासाठी सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा असून, त्यानुसार अडीच वर्षांच्या कार्यकाळातील सव्वा वर्ष शिंदे गटाला महापौरपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालिका निवडणुकीनंतर झालेल्या महायुतीच्या बैठकीत भाजपने शिंदे गटाला याबाबत शब्द दिल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.
त्यामुळे एकीकडे मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर दावा मजबूत करण्यासाठी शिंदे गटाची रणनीती सुरू असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटातील आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी कथित ‘ऑपरेशन टायगर’ सुरू असल्याचे सांगितले जात आहे.



