Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

डॉ. राजेंद्र रुपनवर मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; माजी मंत्र्याच्या PA चं कनेक्शन उघड? रोहित पवारांची मोठी मागणी

सातारा जिल्ह्यातील फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुपनवर यांना माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पीए आणि रुग्णालयातील वरिष्ठांनी त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या गंभीर आरोपाने डॉ. रुपनवर मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. आता या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. रुपनवर यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

माजी मंत्र्यांच्या पीएवर आरोप काय?

मागील जुलै महिन्यात प्रसाद कोंडे देशमुख हा फलटण उपजिल्हा रुग्णालयात फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला गेला होता. त्यावेळी त्याने माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पीए असल्याचा दावा केला होता. वेळेची मर्यादा संपल्यानंतरही तात्काळ सर्टिफिकेट देण्याचा तगादा देशमुख याने लावला होता. परंतु डॉ. रुपनवर यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादात वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्याने देशमुख याला सर्टिफिकेट द्यावे लागले. वाद झाल्यानंतर प्रसास कोंडे देशमुख याने डॉ. रुपनवर यांना धमकावल्याचा देखील आरोप आहे. वादामुळे अस्वस्थ झालेल्या डॉ. रुपनवर यांनी आत्महत्येआधी हातावर लिहिलेल्या नोटमध्ये या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. आता या प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

रोहित पवारांनी काय मागणी केली?

आमदार रोहित पवार म्हणाले, ‘फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि तेवढंच धक्कादायक आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पीए प्रसाद देशमुख याने धमकाण्यासोबतच रुग्णालय प्रशासनाकडूनही त्रास दिल्याचा त्यांचा आरोप आहे. मागील वर्षी याच रुग्णालयात डॉ. संपदा मुंडे यांनीही आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर पुढं काय झालं हे अजूनही स्पष्टपणे पुढं आलं नसताना आता डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी आत्महत्या केली. सामान्य माणसासाठी देवदूताच्या भूमिकेत असलेल्या डॉक्टरांचा असा छळ करुन त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं जात असेल तर हे संतापजनक आहे. सरकारने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करुन यातील दोषी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करावी’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *