उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले भीमाशंकरचे दर्शन; राज्यातील बळीराजा सुखी होवो, अशी भीमाशंकर चरणी केली प्रार्थना

भीमाशंकर – पवित्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ता. ३१ ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येऊन भगवान शिवशंकराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा व दुग्धाभिषेक केला.
श्रावणी सोमवार असल्याने सकाळपासूनच श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. संततधार पाऊस, धुके आणि थंडीची पर्वा न करता राज्याच्या विविध भागांतून हजारो शिवभक्त दर्शनासाठी दाखल झाले. मंदिर परिसरात ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वीच्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचे वृत्त आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भीमाशंकर देवस्थान परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची माहिती घेतली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात नवीन भव्य सभामंडप, घुमट, पायरी मार्ग तसेच भाविकांसाठी विविध सुविधा विकसित करण्याची कामे सुरू आहेत. भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे २८८ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये भाविकांच्या सोयी-सुविधांसह परिसराच्या विकासावर भर देण्यात आला आहे.
भीमाशंकरला देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने दर्शन व्यवस्था, वाहतूक, पार्किंग, पायाभूत सुविधा आणि भाविकांची सुरक्षितता यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. श्रावण महिन्यात मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले असून गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त आणि वाहतूक नियोजन करण्यात आले होते. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पार्किंगच्या ठिकाणांहून मंदिराकडे जाण्यासाठी एसटी बसचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
‘भीमाशंकर हे देशभरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असून, येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी शासन कटिबद्ध आहे, राज्यातील बळीराजांची सर्व संकटे दूर होऊन बळीराजा सुखी होवो अशी प्रार्थना श्री भीमाशंकर चरणी केली आहे.’ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व पुजारी तसेच भाविक भक्त उपस्थित होते.



