“रॉकेल आणा, पेटवून टाकूया…”; गोकुळच्या संस्था अपात्र केल्याने मुश्रीफांच्या निकटवर्तीयांकडून अधिकाऱ्यांना धमकी

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनिमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप यादीवर हरकतीचा निकाल काल देण्यात आला. जवळपास 789 संस्था अपात्र केल्यानंतर सत्ताधारी माजी संचालकांसह ठराव धारकांचा संताप अनावर झाला.
यातूनच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांकडून थेट अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली. मॅनेज होण्यासाठी किती पैसे घेतले. पाच वाजता मुदत संपल्यानंतर साडेपाच वाजता निकाल कसला देताय. खासगी व्यक्तीच्या कार्यालयात निकाल तयार केला आहे. दिवसभर कोणाच्या कार्यालयात होता.
तुला सोडत नाही, बुटाने मारीन, रॉकेल आणा रे पेटवून टाकूया..तुम्हे याद रखेंगे, न्यायालयाच्या वरचे तुम्ही झाला काय?, अशा शब्दांत आज संतापलेल्या दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी उपनिबंधकांचा समाचार घेतला. ताराबाई पार्क येथील सहायक निबंधक, दुग्ध यांच्या कार्यालयात सायंकाळी पाचपर्यंत कच्च्या मतदार यादीवरील हरकतींच्या सुनावण्यांचा निकाल जाहीर करणे आवश्यक होते.
मात्र, सायंकाळी साडेपाचपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातच आले नव्हते, दिवसभर दूध संस्थांचे प्रतिनिधी कार्यालयात ताटकळत होते. त्यामुळे गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्यासह संचालक बाळासाहेब खाडे, एस. आर. पाटील, अजित नरके, कृष्णात चौगले, जिल्हा बॅंकेचे संचालक भैया माने हे कार्यालय परिसरात दाखल झाले. ते अधिकाऱ्यांच्या केबिनसमोर बसून होते. यानंतर वातावरण तणावाचे होऊ लागले.
पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. साडेपाचच्या सुमारास अधिकारी कार्यालयात दाखल झाले. यावेळी सर्वांनी त्यांना घेरले. यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या मोटारीची किल्ली कर्मचाऱ्याला दिली व थोड्याच वेळात निकालाच्या प्रती त्यांच्यासमोर आल्या. सर्वांसमोरच त्यांनी त्यावर सह्या केल्या. यावर संचालक पाटील यांनी निकाल काय दिला, असे विचारल्यावर त्यांनी निकालाची माहिती दिली.
दरम्यान, अपात्र ठरलेल्या संस्थांमध्ये सर्वाधिक कागल, राधानगरी आणि करवीर तालुक्यांतील असून, राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या असल्याचेही संस्था प्रतिनिधींनी सांगितले. ‘ए ॲण्ड जे’चे (संस्थेच्या नोंदीची माहिती) सर्व दिले असतानाही तुम्ही संस्था प्रतिनिधींना अपात्र कसे ठरवले? इतर संस्था प्रतिनिधी सुद्धा संचालक आहेत व नियमित दूध देत आहेत. तरीही आमच्या संस्थेच्या ठरावधारकाला अपात्र कसे ठरवले, असा सवाल खाडे यांनी विचारले.
‘दिवसभर कोणाच्या कार्यालयात होता? मस्ती आली काय रे, तुला सोडत नाही, बुटाने मारीन, रॉकेल आणा रे पेटवून टाकूया, ‘तुम्हे याद रखेंगे’, तुम्ही न्यायालयाच्या वरचे झाला काय?’ असे म्हणत उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला. यावेळी ‘सहकार मंत्र्यांकडे जातो, तू कसा डीडीआर होतोस तेच बघतो, तुझी सर्व माहिती काढणार आहे’, असेही ते म्हणाले.



