Navgan News

आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यानवगण विश्लेषण

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या संतापजनक विधानानंतर, इस्त्रायलने केला तीव्र शब्दात निषेध…

इस्रायलला कर्करोग आणि मानवतेवरील शाप असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संबोधले. बेंजामिन नेतान्याहू यांनी या वक्तव्यानंतर अतिशय कडक शब्दात इशारा दिला आहे. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) स्पष्टपणे सांगितले की, जो देश इस्रायलच्या विनाशाची मागणी करतो, तो कधीही शांततेचा निष्पक्ष मध्यस्थ असू शकत नाही.

या कठोर प्रतिक्रियेमुळे पाकिस्तानच्या हेतूंबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे, “इस्रायलच्या विनाशाची चर्चा सहन केली जाणार नाही.”

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता प्रस्थापित करणारा सर्वात मोठा देश म्हणून जगासमोर स्वतःला सादर करत आहे. तथापि, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या एका विषारी वक्तव्याने ही संपूर्ण योजना हाणून पाडली आहे. इस्रायलला “कर्करोग” आणि “मानवतेवरील शाप” संबोधून आसिफ यांनी अशी नामुष्की ओढवून घेतली आहे की, इस्रायलच्या पंतप्रधानांनी आता त्यांच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बेंजामिन नेतान्याहू यांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यांना अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय म्हटले आहे. या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, कोणताही जबाबदार देश अशा द्वेषपूर्ण भाषेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडियावर सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले की इस्रायल हा मानवतेसाठी कर्करोग आणि एक शाप आहे. आसिफ यांच्या पोस्टमध्ये असा आरोप करण्यात आला की, इस्लामाबादमध्ये शांततेची तयारी सुरू असताना लेबनॉनमध्ये नरसंहार होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *