इराणला घेरले, ५० हजार सैनिक आतपर्यंत घुसले; इराणवर हल्ला करण्यासाठी अनेक अमेरिकी सैनिक तैनात…

America Iran War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध व इराणशी सुरू असलेल्या युद्धाच्या विरोधात संपूर्ण अमेरिका आणि युरोपमध्ये ‘नो किंग्स’ रॅलींच्या माध्यमातून जनक्षोभ उसळला आहे.
न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी आणि लॉस एंजेलिससह अमेरिकेतील लहान-मोठ्या शहरांमध्ये लाखो आंदोलकांनी ट्रम्प प्रशासनाचा निषेध केला. हे आंदोलन केवळ अमेरिकेपुरते मर्यादित न राहता जगातील १२ पेक्षा जास्त देशांत पसरले. अमेरिका-युरोपमध्ये ३,३०० ठिकाणी भव्य निदर्शने, लोकशाहीसाठी घोषणाबाजी करण्यात आली. ट्रम्प यांचा निषेध करण्यासाठी सुमारे ८० लाख नागरिक रस्त्यावर उतरल्याचे म्हटले जात आहे. यातच इराणला आता चारही बाजूंनी घेरण्याची तयारी करण्यात आली असून, अमेरिकेचे ५० हजार सैनिक डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट पाहत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अमेरिका इराण युद्धात दररोज नवनवीन घटना घडताना पाहायला मिळत आहे. काही केल्या इराण शरणागती पत्करण्यास तयार नाही. अमेरिकाही माघार घेत नसल्याचे दिसत आहे. मध्य-पूर्वेतील अमेरिकी सैनिकांची संख्या ५० हजाराच्या वर गेली आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या सैनिकांची संख्या जवळपास १० हजाराने वाढली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, ५०० हजार नव्या सैनिकांच्या प्रवेशाने इराणभोवती अमेरिकेचा वेढा अधिक मजबूत झाला आहे. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते, असे म्हटले जात आहे.
इराणवर हल्ला करण्यासाठी अनेक अमेरिकी सैनिक तैनात
अमेरिकी लष्कराच्या ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनचे हजारो सैनिक इराणवर हल्ला करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत, असे म्हटले जात आहे. ही लष्करी जमवाजमव होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे आणि इराणी हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे या उद्देशाने करण्यात आली आहे. मात्र, लष्करी तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की, इराणसारख्या मोठ्या देशावर ताबा मिळवण्यासाठी ५० हजार सैनिक ही संख्या खूपच कमी आहे. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटासह ९० हून अधिक लष्करी तळांवर बॉम्बहल्ला केला आहे.
दरम्यान, पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्तसारख्या मध्यस्थांमार्फत गुप्तपणे प्रयत्न करूनही, अमेरिका आणि इराण यांच्यात थेट चर्चा झालेली नाही. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी म्हटले आहे की, ही तयारी एक नियमित प्रक्रिया आहे.



