Navgan News

ताज्या बातम्याराजकीयराष्ट्रीय

‘रात्री 12 वाजता बॉम्बस्फोट होणार..’, संजय राऊतांच्या घराबाहेरच्या कारवर मजकूर कोणी लिहिला?


मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नाहूर येथील निवासस्थानाबाहेर बुधवारी रात्री (दि.31) अचानक खळबळ उडाली. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बंगल्या समोर बराच काळ उभ्या असलेल्या आणि धूळ साचलेल्या एका वाहनावर धक्कादायक मजकूर आढळून आला.

“आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार” असा इशारा लिहिलेला दिसताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्बशोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही जोखीम नको म्हणून वाहनासह संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी करण्यात आली. बॉम्बशोधक पथकाने विशेष उपकरणांच्या सहाय्याने कारच्या आत-बाहेर तसेच आसपासच्या भागाची झडती घेतली. काही काळासाठी रस्त्यावर हालचालींवर मर्यादा आणण्यात आल्या होत्या. स्थानिक रहिवासी आणि परिसरातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत होती. तपासादरम्यान कोणताही संशयास्पद स्फोटक पदार्थ, वायर किंवा धोकादायक वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे प्राथमिक तपासात हा इशारा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, संदेश कोणी आणि कोणत्या उद्देशाने लिहिला, याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू ठेवली.

चिमुकले सीआयडीचा खेळ खेळत होते, त्यांनीच लिहिला मजकूर

पोलीस चौकशीतून दिलासादायक माहिती समोर आली. परिसरातील काही लहान मुलं ‘सीआयडी’ मालिका पाहून त्याच पद्धतीने खेळ खेळत होते. त्याच खेळाच्या ओघात एका मुलीने मजेशीर स्वरूपात हा मजकूर वाहनावर लिहिल्याचे उघड झाले. कोणताही वाईट हेतू नसून केवळ खेळाचा भाग म्हणून हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. ही बाब स्पष्ट होताच पोलिस, सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, अशा प्रकारच्या खोड्यांमुळे मोठी सुरक्षा यंत्रणा कामाला लागली, वेळ आणि संसाधनांचा अपव्यय होतो, याची जाणीव करून देणारी ही घटना ठरली. पोलिसांनी पालकांनाही मुलांच्या अशा कृतींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, कोणताही धोका नसल्याचे निश्चित झाल्यानंतर परिसरातील परिस्थिती पूर्ववत झाली. तरीही, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे संदेश किंवा इशारे आढळल्यास ते गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *