महाराष्ट्र हादरवणाऱ्या प्रकरणात धक्कादायक वळण, दोन्ही मुलांनी आई-बापाचा गळा घोटला अन् नंतर…

नांदेड : नांदेड जिल्ह्यात झालेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. स्वतःच्या पोटच्या मुलांनीच आई-वडिलांचा गळा दाबून खून करून नंतर आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
आई-वडिलांचा शविच्छेदन अहवालानंतर खरे कारण समोर आले.
मुडखेड तालुक्यातील जवळा मोरार येथे 25 डिसेंबर रोजी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले होते. 51 वर्षीय रमेश लखे आणि त्यांची पत्नी 44 वर्षीय राधा लखे या दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते. तर 25 वर्षीय उमेश लखे आणि त्याचा भाऊ 22 वर्षीय बजरंग लखे या दोघांचे मृतदेह मुगट रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पटरीवर कटलेल्या अवस्थेत आढळले होते.
पोटच्या लेकरांनी केली आई-वडिलांची हत्या
एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.आई-वडिलांचा मृत्यू गळफास घेतल्याने नव्हे तर गळा दाबल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. इतर तांत्रिक तपास केला असता मुलांनी अगोदर आई-वडिलांची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
शवविच्छेदन अहवालात काय समोर आलं?
वडील रमेश लखे हे 25 वर्षापासून आजारी होते. त्यांच्या उपचारासाठी लागणाऱ्या सततच्या खर्चाला कंटाळून दोन्ही मुलांनी आई-वडिलांचा गळा दाबून खून केल्याचे तपासात समोर आले. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर नातलगाच्या तक्रारीवरून याप्रकरणी दोन्ही मयत मुलांवर कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींनी ही आत्महत्या केल्याने याप्रकरणी कुठलीही चार्जशीट न्यायालयात दाखल न करता अवेटेड समरी दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आई वडिलांचा खून केल्या नंतर मुलांना पश्चाताप झाला असेल आणि त्यातून त्यांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली असावी असा पोलीसांचा अंदाज आहे.
मुदखेड तालुक्यात हळहळ
पोलिस तपासात या घटनेमागे आर्थिक अडचणी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. कुटुंब आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती असून, त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने जवळा मुरारसह संपूर्ण मुदखेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.






