Navgan News

ताज्या बातम्यानवगण विश्लेषण

चंगेझ खानाने अर्ध जग सांभाळलं, पण त्याला भारताच्या दारातूनच का परत जावं लागलं?


त्याचं नाव होतं तेमुजिन पण जगभरात तो ओळखला जातो चंगेझ खान म्हणून.

सन 1162 साली बैकल तलावाच्या पूर्वेकडील एका ओसाड-उजाड भागातील एका भटक्या समुदायाच्या नेत्याच्या घरी मुलाचा जन्म झाला.

‘द सिक्रेट हिस्ट्री ऑफ मंगोल’ या पुस्तकात म्हटलं आहे की, जन्मल्यावर त्याच्या तळहातावर रक्ताचा एक ठिपका होता. तो भविष्यात महान विजेता असेल, याची खूण म्हणून सगळ्यांनी त्याकडे पाहिलं.

शत्रूंनी त्याच्या वडिलांना विष देऊन मारलं आणि लहान वयातच तो पोरका झाला.

नावात खान असल्यामुळं अनेकांना तो मुसलमान वाटतो. पण खान ही आदरवाचक उपाधी आहे. तो मूळचा मंगोल होता आणि शामानी धर्माचं पालन करायचा. या धर्मात आकाशाची पूजा करण्याची पद्धत आहे.

चंगेझ खानचं सुरुवातीचं आयुष्य अतिशय हलाखीत आणि गरीबीत गेलं.

त्याच्या विजयाची गोष्ट वयाच्या पन्नाशीत सुरू झाली. तिथूनच त्याची गणती जगातील श्रेष्ठ योद्ध्यांमध्ये करण्यात येऊ लागली.

चंगेझ खानच्याच नेतृत्वाखाली मंगोल राजघराण्याचा उदय झाला. याच मंगोल घराण्याने चीन, मध्य आशिया, इराण, पूर्व युरोप आणि रशियाच्या एका मोठ्या भागावर राज्य केलं.

चंगेझचे सैनिक ऑस्ट्रिया, फिनलँड, क्रोएशिया, हंगेरी, पोलंड, व्हिएतनाम, ब्रह्मदेश, जपान आणि इंडोनेशियापर्यंत पोहोचले होते.

एफ ई क्राऊज यांनी आपल्या एपॉक डेर मंगोलेन या पुस्तकात म्हटलं की, “चंगेझचं साम्राज्य एक कोटी वीस लाख चौरस मैल इतक्या भागात पसरलं होतं. म्हणजेच आफ्रिका खंडाएवढं किंवा उत्तर अमेरिका खंडापेक्षा मोठं. चंगेझच्या साम्राज्याशी तुलना करता रोमन साम्राज्य अतिशय लहान वाटावं असं होतं.”

अलेक्झांडर किंवा सिकंदरजवळ त्याचे वडील फिलिप यांनी उभारलेली लष्करी यंत्रणा होती. ज्यूलियस सीझरच्या पाठीशी 300 वर्षं जुन्या रोमन साम्राज्याच्या श्रेष्ठत्वाचा ऐतिहासिक वारसा होता.

फ्रेंच राज्यक्रांतीनंतर मिळालेल्या लोकांच्या पाठिंब्यामुळे नेपोलियनला राज्य करणं शक्य झालं होतं.

या सगळ्यांशी तुलना करता चंगेझ खानला स्वतःचा वारसा स्वतःच निर्माण करावा लागला. त्यावेळेच्या सामाजिक-राजकीय समस्यांना तोंड देत त्यानं स्वतःचं स्थान निर्माण केलं.

सावत्र भावाची हत्या

तरुणपणी त्याने ससाण्यांच्या मदतीनं पक्षांची शिकार करण्याची कला शिकली. त्याकाळी नेत्यासाठी हा आवश्यक गुण मानला जायचा. तो कधी लिहायला-वाचायला शिकला नाही.

13 व्या वर्षी त्याने सावत्र भाऊ बेहतेरची हत्या केली.

 Getty Images

फ्रँक मॅकलिन ‘चंगेझ खान- द मॅन हू कॉन्क्वर्ड द वर्ल्ड’ या पुस्तकात लिहितात की, “एवढ्या कमी वयात ज्या पद्धतीने त्याने भावाची हत्या केली त्यावरून कळतं की लहानपणापासूनच तो निर्दय होता. वयात येत असतानाच तो भविष्याचा विचार करायला लागला होता.

बेहतेरला तो स्वतःचा प्रतिस्पर्धी समजत होता. वडिलांचा वारसदार होण्याचा दावा तो करू शकत होता, कारण तो सर्वांत मोठा मुलगा होता.”

हळूहळू चंगेझने तरुण योद्धा म्हणून स्वतःला प्रस्थापित करायला सुरुवात केली. त्याची बरीचशी हयात तंबू आणि लढायांमध्येच गेली. प्रशासनासारख्या गोष्टीकडे लक्ष द्यायला त्याला वेळच मिळाला नाही.

प्रसिद्ध इराणी इतिहासकार मिनहाज अल सिराज जुजजानी यांनी लिहिलं आहे की, “चंगेझकडे प्रचंड क्षमता होती. त्याने परमेश्वराप्रमाणे आपल्या सैन्याचं नेतृत्व केलं. जेव्हा तो खरासानला आला तेव्हा त्याचं वय होतं 65 वर्षं.

तो उंचापुरा आणि भारदस्त शरीरयष्टीचा होता. त्याचे केस तोपर्यंत विरळ आणि पांढरे झाले होते. त्याचे डोळे मांजरासारखे बिलंदर होते. शरीरात प्रचंड उर्जा होती. शत्रूंसाठी तो प्रचंड निर्दयी होता.”

विषारी बाणाने जखमी

जमूगासोबत झालेल्या लढाईत चंगेझच्या मानेत एक विषारी बाण येऊन लागला.

फ्रँक मॅकलिन लिहितात, “त्याकाळी बाणांवर सापाचं विष लावलं जायचं. हे टोकदार बाण होते, ते शरीरात घुसल्यानंतर सहज निघायचे नाहीत आणि त्याचं विष वेगानं पसरायचं. त्यावर

उपचार म्हणजे व्यक्तीची जखम धुवायची आणि त्याला दूध प्यायला द्यायचं. पण चंगेझची जखम गंभीर होती. कारण बाणाने त्याच्या गळ्याजवळची नस कापली गेली होती आणि प्रचंड रक्तस्राव होत होता.

 Calcutta University Press

अशावेळी चंगेझचा एक कमांडर जेल्मेने त्याचा जीव वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जेल्मेला रक्तस्राव थांबवता आला नाही, पण त्याने चंगेझच्या मानेतून विषयुक्त रस चोखून थुंकायला सुरूवात केली.”

थोड्याच वेळात चंगेझला शुद्ध आली. जेल्मेने त्याच्यासाठी दुधाची व्यवस्था केली आणि त्याचा जीव वाचवला. पण चंगेझने त्यालाच जाब विचारायला सुरुवात केली की, तू ते विषारी रक्त थोडं लांब थुंकू शकत नव्हतास का?

चंगेझमध्ये अनेक अवगुण

चंगेझच्या व्यक्तिमत्त्वात भलेही अनेक दुर्गुण असतील, पण बहुतांश इतिहासकारांच्या मते त्याचं राजकीय कौशल्य वादातीत होतं.

रशियाच्या इतिहासावर अभ्यास करणाऱ्या जॉर्ज वेरनाडस्की यांनी ‘मंगोल्स अँड रशिया’ या पुस्तकात लिहिलं होतं, “लष्करी डावपेचात चंगेझचा हात कोणी धरू शकणार नव्हतं. पण सैनिक म्हणून तो तितका प्रभावी नव्हता.

लोकांचं मन आणि बुद्धा जाणण्याची त्याची क्षमता प्रचंड होती. त्याच्याकडे कल्पनाशक्तीही होती. अनेक वैयक्तिक संघर्षांतून तो वर आला होता. तो दूरदर्शी, संयमी आणि चलाख होता. पण त्याच्यामध्ये कृतघ्नता, प्रतिशोध घेण्याची भावना आणि क्रौर्यही होतं.”

 Vintage

मर्किटसोबतच्या लढाईत चंगेझची पत्नी बोर्ते हिचं अपहरण करण्यात आलं होतं. ‘द सिक्रेट लाइफ ऑफ मंगोल’ या पुस्तकात चंगेझवर टीका करण्यात आली आहे. त्यात म्हटलंय की, त्याने पत्नीला मर्किटच्या तावडीत सापडू दिलं. इतर महिला मर्किटच्या तावडीतून बचावल्या. त्यात चंगेझची आई होएलुनही होती.

याच पुस्तकात लिहिलं आहे की, चंगेझ स्वतः बोर्तेच्या घोड्यावर बसला आणि त्यामुळे तिचं अपहरण झालं. बेहेतरच्या हत्येनंतर चंगेझच्या आईनेच ‘जनावर’ आणि ‘राक्षस’ म्हणून त्याची निर्भत्सना केली होती.

त्याच्या बाबतीत असंही म्हटलं जायचं की, तो सतत सतर्क आणि चौकस राहायचा. आघाडीवर राहून सैन्याचं नेतृत्व करणं त्याच्या स्वभावात नव्हतं.

चंगेझ खानचा संताप

संतापामध्ये चंगेझला चांगल्या-वाईटाचं भान राहायचं नाही.

1220 च्या दशकात ट्रांजोक्सियानावर ताबा मिळवल्यानंतर त्याने पश्चिम आशियातील राजकुमारांसोबत पत्र व्यवहारासाठी एका दुभाषा आणि कारकुनाची मदत घेतली होती.

 Getty Imagesचंगेझ खानचा दरबार

मिनहाज सिराज जुजजानी यांनी ‘तबाकत-ए-नासिरी’ या पुस्तकात लिहिलं आहे, “चंगेझला कळलं की मोसुलचा राजकुमार सीरियावर हल्ला करणार आहे. त्याने आपल्या कारकुनाकडून एक पत्र लिहून त्याला धमकावलं की, असं करण्याची हिंमतही करू नकोस.

कारकुनाने राजकीय समज दाखवत पत्राची भाषा थोडी मवाळ केली आणि मोसुलच्या राजकुमारासाठी इस्लामिक जगतात प्रचलित असलेल्या आदरयुक्त संबोधनांचा वापर केला.

चंगेझने दुभाषाकडून ते पत्र मंगोल भाषेत वाचून घेतलं तेव्हा संतापाने तो लालबुंद झाला. त्याने त्या कारकुनाला म्हटलं की, तू ‘गद्दार’ आहेस, पत्राची ही अशी भाषा वाचून मोसुलचा राजकुमार अजूनच अहंकारी होईल.”

त्याने टाळी वाजवून एका शिपायाला बोलावलं आणि त्या कारकुनाला जीवे मारण्याचा आदेश दिला.

क्रूरतेसोबतच उदारता

चंगेझच्या क्रूरपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. एखादं शहर जिंकल्यानंतर तो तरुण आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना सोडून बाकी सर्वांना मैदानात उभं करून बाणाने मारायचा.

जेकब एबट आपल्या ‘द हिस्ट्री ऑफ गैंगिस ख़ाँ’ या पुस्तकात लिहितात, “एकदा एका वृद्ध महिलेने मंगोलांना तिला सोडून देण्याच्या मोबदल्यात एक किमती मोती देण्याचं कबूल केलं.

चंगेझच्या शिपायांनी तिला विचारलं की, मोती आहे कुठे? आपण तो गिळल्याचं तिने सांगितलं. तेव्हा मंगोलांनी तो मोती मिळवण्यासाठी तिचं पोट कापलं. त्यांना मोती मिळालाही. यावर त्या सैनिकांना वाटलं की, अनेक महिलांनी अशाच पद्धतीने मोती-नाणी लपवली असतील. तेव्हा त्यांनी अनेक महिलांची पोटं कापली.”

 Getty Images

चंगेझचा नातवंडांवर खूप जीव होता. पॉल राचनिउस्की त्यांच्या ‘गैंगिस खाँ हिज लाइफ अँड लिगसी’ मध्ये लिहितात, “त्याचा एक नातू बामियानच्या वेढ्यावेळी मारला गेला. त्यानंतर त्याने त्या भागातल्या सर्वांनाच मारण्याचा आदेश दिला. त्यात अगदी कुत्री, मांजरं आणि कोंबड्याही होत्या.”

परंतु कधीकधी तो प्रमाणाबाहेर उदार व्हायचा. एकदा त्याने एका शेतकऱ्याला प्रचंड उन्हात घाम गाळत कष्ट करताना पाहिलं. त्यानंतर त्याचे सगळी कर माफ केले आमि त्याला वेठबिगारीतून मोकळं केलं.

क्रौर्याचंही समर्थन

चंगेझ खान हा एक क्रूर, विश्वासघातकी आणि बदला घेणारा व्यक्ती होता, यावर जवळपास सर्वच इतिहासकारांचं एकमत आहे. काही इतिहासकारांनी तर तो मनोरुग्ण असल्याचंही म्हटलं होतं.

चंगेझ खानने आपण केलेल्या हत्यांचंही समर्थन करत त्या योग्यच असल्याचं म्हटलं होतं. आपण नेहमीच गद्दार, कपटी आणि देशद्रोही लोकांचीच हत्या केल्याचं त्याचं म्हणणं होतं.

 Getty Images

वर्नाडस्की लिहितात, “त्याच्या समकालीनांना मात्र या गोष्टी विचित्र वाटत नव्हत्या. कारण 21 व्या शतकात आपण ज्या गोष्टींना गुन्हे मानतो, तेराव्या शतकात त्या सर्वमान्य गोष्टी होत्या. ख्रिश्चन आक्रमकांनीही या गोष्टी केल्या होत्या.

क्रूरतेच्या बाबतीत 16 व्या शतकातल्या इंग्लंडच्या आठव्या हेन्रीपेक्षा तो कमीच होता. तैमूरलंग आणि चिनी शासकही क्रौर्याच्या बाबतीत त्याच्यापेक्षा वरचढ होते.”

चंगेझ खानने नेहमीच म्हटलं होतं की, त्याच्या ‘आत्मसमर्पण करा किंवा मरायला तयार व्हा’ या नीतीमुळे अनेक शत्रूंना त्यांचा जीव वाचवण्याची संधी मिळाली होती.

चंगेझच्या बाबतीत असंही म्हटलं जातं की, आपल्या साम्राज्य विस्तारात तो इतका व्यस्त होता की, कधी घोड्यावरूनही खाली उतरला नाही. आरामशीर बिछान्यावर झोपला नाही. अनेकदा उपाशीपोटी राहिला आणि त्याला सतत जीवाची भीती वाटायची.

जेव्हा भारताच्या सीमेवरून परतावं लागलं

इ.स. 1211 ते 1216 हा पाच वर्षांचा काळ चंगेझने मंगोलियापासून दूर असलेल्या चीनला जिंकण्याच्या प्रयत्नात खर्च केला.

जलालउद्दीनचा पाठलाग करत करत चंगेझ भारताच्या सीमेपर्यंत पोहोचला. चंगेझ आणि जलाल यांच्या सैन्यातील अखेरची लढाई सिंधू नदीच्या काठावर झाली. चंगेझने जलालच्या सैन्याला तीन बाजूंनी वेढा घातला होता. मागच्या बाजूला सिंधू नदी वाहत होती.

विल्हेल्म बार्थोल्ड ‘तुर्किस्तान डाऊन टू द मंगोल इन्व्हेजन’ या पुस्तकात लिहितात की,”जलालने त्याच्याच सर्व नौका नष्ट करून टाकल्या, जेणेकरून त्याचे सैनिक रणांगणातून पळून जाऊ शकणार नाहीत.

चंगेझकडे जलालपेक्षा अधिक सैनिक होते. चंगेझचा पहिला हल्ला जलालने परतवून लावला. चंगेझचं सैन्य खूप कमी भागात पसरलं होतं, त्यामुळे त्यांना बाण चालवण्यात अडचण येत होती. त्यामुळे त्यांना तलवारींनी लढावं लागत होतं.”

 Getty Imagesसिंधु नदीच्या काठावर झालेली चंगेझ खान आणि जलालुद्दीनमधली लढाई

या लढाईचे वर्णन करताना मोहम्मद नेसावी लिहितात, “जेव्हा मंगोलांचा रेटा वाढू लागला, तेव्हा जलालउद्दीनने आपल्या घोड्यासह 180 फूट खोल असलेल्या सिंधू नदीत उडी मारली. नदी पार करून जलाल दुसऱ्या काठावर पोहोचला.

जलालउद्दीनचे शौर्य पाहून चंगेझने तीरंदाजांना त्याच्यावर निशाणा साधण्यास मनाई केली; मात्र त्याच्या इतर साथीदारांना त्यानं सोडलं नाही. चंगेझच्या तीरंदाजांनी अचूक निशाणा साधत बहुतेकांना ठार केले. जलालची सर्व मुलं आणि पुरुष नातेवाईकांना चंगेझने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.”

जलालउद्दीन तिथून दिल्लीकडे निघाला; मात्र दिल्लीचा सुलतान इल्तुतमिशने मंगोल आक्रमणाच्या भीतीने त्याला आश्रय द्यायला नकार दिला.

भारताच्या उष्णतेने दिला त्रास

जलाल दिल्लीपर्यंत पोहोचू शकला नाही, पण चंगेझने त्याचा पाठलाग करण्याचा विचार सोडून देईपर्यंत तो भारतातच थांबला.

चंगेझ मंगोलियाला परत गेल्याची खात्री झाली तेव्हाच तो नावेतून सिंधू नदीच्या मुखाजवळून बाहेर पडला आणि सागरी मार्गाने इराणला पोहोचला.

चंगेझचा आधीचा इतिहास पाहता जलालउद्दीनचा पाठलाग सोडून देणे आणि भारतात आपले सैन्य न पाठवणे हे आश्चर्यकारक होते.

फ्रँक मॅकलिन लिहितात,”प्रत्यक्षात चंगेझने बाला आणि दोरबी दोक्श्न यांच्या नेतृत्वाखाली दोन तुकड्या भारतात पाठवल्या होत्या. त्यांनी सिंधू नदी पार करून लाहोर आणि मुलतानवर हल्ले केले; मात्र ते मुलतानवर ताबा मिळवू शकले नाहीत. पुढे जाऊ न शकण्याचे कारण त्या भागातील तीव्र उष्णता होती, त्यांना याची अजिबात सवय नव्हती.”

 Getty Images

दिल्लीचा सुलतान इल्तुतमिशने जलालउद्दीनला आश्रय दिला नसला तरी त्याने चंगेझलाही जलालउद्दीनचा पाठलाग करण्यासाठी प्रोत्साहन दिले नाही.

जॉन मॅकलॉइड आपल्या ‘हिस्ट्री ऑफ इंडिया’ या पुस्तकात लिहितात, “इल्तुतमिशने स्पष्ट नकार देऊन चंगेझला नाराज केले नाही. भारतात घुसून जलालउद्दीनचा पाठलाग करण्याच्या चंगेझच्या विनंतीला त्याने ना होकार दिला, ना नकार.

चंगेझने इल्तुतमिशची भूमिका ओळखली. त्याच्या लक्षात आले की,या मुद्द्यावर इल्तुतमिश त्याच्याशी युद्ध करू इच्छित नाही. चंगेझही इल्तुतमिशशी लढण्याच्या मनःस्थितीत नव्हता.”

डी. आर. विंक आपल्या ‘स्लेव्ह किंग्स अँड द इस्लामिक कॉन्क्वेस्ट’ या पुस्तकात लिहितात, “भारतातली उष्णता चंगेझसाठी सहन होणारी नव्हती. त्यामुळेच चंगेझच्या सेनापतींनी परत फिरण्याचा निर्णय घेतला.”

घोड्यांच्या चाऱ्याची टंचाई

चंगेझसमोर आणखी एक मोठी समस्या म्हणजे घोड्यांची होती. इब्न बतूतानेही लिहिलं आहे की, मंगोल सैन्याच्या दहा हजार घोड्यांच्या तुकडीसाठी सुमारे 250 टन चारा आणि अडीच लाख गॅलन पाण्याची आवश्यकता होती. सिंध आणि मुलतानमध्ये पाणी उपलब्ध होते, पण चारा नव्हता.

शिवाय त्या प्रदेशात चांगल्या प्रजातीच्या घोड्यांचीही कमतरता होती, त्यामुळे अतिरिक्त घोड्यांची व्यवस्था करणे शक्य नव्हते.

या व्यतिरिक्त, चंगेझने इतका मोठा भूभाग जिंकला होता की, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे सैनिक नव्हते. सैनिकांच्या आरोग्याचाही प्रश्न होता.

 Getty Images

फ्रँक मॅकलिन लिहितात, “चंगेझचे अनेक सैनिक ताप आणि त्या प्रदेशातील आजारांना बळी पडले होते. भारतातल्या जंगलं आणि पर्वतांची अचूक गुप्त माहितीही चंगेझकडे नव्हती. चंगेझ अंधश्रद्धाळूही होता.

त्याच्या सैनिकांना एक गेंडा दिसला होता, पुढे जाण्यासाठी तो अपशकुन मानला गेला. या कारणांमुळेच चंगेझने आपल्या देशात परतण्याचा निर्णय घेतला.”

चंगेझचा शेवटचा संदेश

जुलै 1227 पर्यंत चंगेझची तब्येत खालावू लागली होती. एके दिवशी त्याने त्याच्या सर्व मुलांना आणि विश्वासू सेनापतींना बोलावून घेतले.

मंगोल लोकांना सांगण्यात आलं होतं की, चंगेझला केवळ ताप आहे. पण बिछान्याजवळ उभ्या असलेल्या लोकांना कळलं होतं की, तो फार काळ जिवंत राहू शकणार नाही.

 Getty Imagesमृत्यूशय्येवर चंगेझ खान

आर. डी. थॅक्स्टन आपल्या ‘द हिस्ट्री ऑफ मंगोल्स’ या पुस्तकात लिहितात,

“मृत्यू जवळ आलेल्या चंगेझने मुलांना सांगितलं की आयुष्य फार छोटं आहे. मी संपूर्ण जग जिंकू शकलो नाही. हे काम तुम्हाला पूर्ण करायचे आहे.

मी तुमच्यासाठी जगातील सर्वात मोठं साम्राज्य सोडून जात आहे. त्याचे रक्षण फक्त एका गोष्टीने होऊ शकते. तुम्ही एकत्र राहा. जर तुम्ही आपसात लढलात, तर हे साम्राज्य तुमच्या हातून निसटून जाईल.'”

काही काळानंतरच चंगेझने या जगाचा निरोप घेतला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *