कोरोना सारखा भयानक आजार पुन्हा येणार? डब्लूएचओ प्रमुखांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा …

जगात आणखी एक साथीचा रोग येण्याची शक्यता आहे व ही केवळ एक शक्यता नाही तर एक खरा धोका आहे, जो आरोग्य अभ्यासात सिद्ध झाला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेयसस यांनी म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की पुढील जागतिक संकट कधीही येऊ शकते. याला २० वर्षे लागू शकतात किंवा ते अगदी उद्याही येऊ शकते
डब्ल्यूएचओच्या महासंचालकांनी जगाला पुढील साथीच्या आजारासाठी आगाऊ तयारी करण्याचा इशारा दिला आणि सल्लाही दिला. ते म्हणाले की, भू-राजकीय आणि आर्थिक संकटामुळे करोना साथीच्या आठवणी धूसर होत चालल्या आहेत. तथापि, आपण पुढील साथीच्या आजारासाठी तयार असले पाहिजे. करोना साथीमुळे अधिकृतपणे ७० लाख लोकांचा मृत्यू झाला. आमचा अंदाज आहे की मृतांची प्रत्यक्ष संख्या यापेक्षा खूप जास्त असू शकते. याशिवाय, या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे अंदाजे १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले.
त्यांनी त्यांच्या निवेदनात आशा व्यक्त केली आहे की डब्लूएचओ साथीच्या करारावर वाटाघाटी दरम्यान एकमत होऊ शकेल. त्यांनी असेही आश्वासन दिले की हा करार कोणत्याही सदस्याच्या सार्वभौमत्वाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणार नाही. यामुळे राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि आंतरराष्ट्रीय कृती आणखी मजबूत होईल असे ते म्हणाले.