Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं ….
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीतून (Maharashtra Assembly Elections 2024) माघार घेतली आहे. एकाही जागेवर उमेदवार उभा करणार नाहीत.
सोबत घेतलेल्या पक्ष, घटकांनी आतापर्यंत आपल्या उमेदवारांची यादी न दिल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केले. पण मराठा समाजाने ज्याला पाडायचं आहे, त्याला पाडावं, असंही त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे यांनी जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो. देर आए दुरुस्त आए, एका समाजावर निवडणूक लढता येत नाही. मराठा समाजाचे लोक आता मोकळेपणाने राहतील. कुठलेही दडपण येणार नाही. मराठा समाजाचे 60 ते 70 टक्के उमेदवार आहेत. जरांगे यांचा निर्णय अतिशय योग्य आहे.
सर्व धर्मीयांचा पाठींबा हवा हेच यातून ध्वनित
दलित आणि मुस्लीम उमेदवारांची यादी न आल्याने निर्णय घेतल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, त्यांनी बोलल्यावर मी काय बोलणार, सर्व धर्मीय आणि सर्व समाजाचा पाठींबा हवा आहे हेच यातून ध्वनित होते. राजकीय पक्षाचा प्रयत्न असाच असतो की, सर्व धर्मीय आणि सर्व समाजामध्ये काम करणे आणि त्यातून निवडून येणे हेच सर्व पक्ष करत असतात.
आरक्षणाचे आंदोलन हा एक सामाजिक प्रश्न
मनोज जरांगे यांनी निवडणुकीनंतर काय होईल हे सांगता येणार नाही. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात काहीतरी सुरु आहे, असे वक्तव्य केले. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, त्यांना जसे सांगता येत नाही तसे मला देखील सांगता येत नाही. मनोज जरांगे यांनी माघार जरी घेतली असली तर आंदोलन सुरूच राहणार असेही म्हटले. याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, आरक्षणाचे आंदोलन हा एक सामाजिक प्रश्न आहे. मी समता परिषदेच काम अनेक वर्षांपासून करत आहे. पण आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून निवडणूक लढवत नाही आणि लढू शकत नाही. कारण निवडणूक लढण्यासाठी त्या उमेदवाराने तिथल्या मतदारांचा विश्वास संपादन करावा लागतो. मी कुठल्यातरी सामाजिक संस्थेचा आहे म्हणून मला मतदान करा, असे होत नाही. त्यामुळे जरांगे यांचे काम सुरु राहील, असे त्यांनी म्हटले.