‘मनोज जरांगे मनोरुग्ण’, निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर लक्ष्मण हाकेंची जहरी टीका
मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. ही निवडणुकीतून माघार नाही तर गनिमी कावा असल्याचं सांगितलं. त्यांनी आपल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंच्या या भूमिकेवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हाके यांची जरांगेंवर टीका करताना जीभ घसरली.
हाके यांनी मनोज जरांगे यांना वटवाघूळ आणि मनोरुग्णाची उपमा दिली आहे. टीका करताना ते जरांगेंना मनोरुग्ण म्हणाले इतकंच नाही वघवाघूळ आपल्या औकातीवर आलं असंही ते म्हणाले, लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले वाचा.
जरांगेंचा युटर्न?लक्ष्मण हाके पहिली प्रतिक्रिया
सामाजिक तेढ निर्माण केली होती. बेकायदेशीर मागण्या करायच्या, असंविधानिक मागण्या करायच्या आणि महाराष्ट्रात तेढ निर्माण कराची, झुंडशाही उभी करुन ओबीसींच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, आंदोलनं उभी करायची. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रचार त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी केला. ते गणित विधानसभा निवडणुकीत लागू होत नाही असं दिसल्यानंतर कुणाच्यातरी सांगण्यावरुन त्यांनी ही माघार घेतली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मी महाराष्ट्रात सांगत आलोय की जरांगे कुठल्या तरी हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होतील. निवडणूक लढवण्यासाठी कुठलीतरी भूमिका घ्यावी लागते. कुठल्यातरी नेत्याला शिव्या द्यायच्या, ओबीसींचे उमेदवार पाडा म्हणायचे, याला पाडा त्याला गाढा म्हणायचं, यांच्या सात पिढ्या निवडणून आल्या नाही पाहिजेत. लोकशाही विरोधी एखादा हुकूमशाह किंवा मनोरुग्ण ज्या पद्धतीने बरळत असतो त्या पद्धतीनं ते बोलत राहिले. महाराष्ट्रातील वातावरण विनाकारण ते कलुषित करत राहिले. त्यांनी जी भूमिका घेतली ती मी वेळोवेळी मांडली आहे. मनोज जरांगे पाटील निवडणूक लढणार नाहीत. ते निवडणूक लढणार नाहीत. निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक घरात जावं लागतं. प्रत्येक माणसाला मत मागावं लागतं.
जरांगे पाटील पाडा पाडीची भाषा करतात. आम्ही बघून घेतो, घरं जाळतो, गावबंदी करतो या सगळ्याला लोक वैतागली आहेत. जरांगे नावाचं वटवाघूळ आहे ते स्वत: च्या औकातीवर आलेलं आहे. त्यांना त्याची रिअॅलिटी कळलेली आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
लोकसभेपाठोपाठ विधनसभेवर जरांगे फॅक्टरचा किती परिणाम होणार?
विधानसभेवर मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा कोणताही परिणाम होणार नाही. ज्या फांदीवर जरांगे बसले होते त्याच फांदीवर घाव घालायचं काम ते करत होते. हे बाब माझ्या मराठा बांधवांच्या लक्षात आली. त्यांचीच फांदी हे तोडायला निघाले होते. दु:ख या गोष्टीचं वाटतं, शरद पवार अशा बेकायदा मागण्यांना पाठिंबा देतात त्यावेळी आमच्यासारख्या भटक्या विमुक्त जाती आणि ओबीसींच्या मनात संभ्रमाची अवस्था निर्माण होते, खेद वाटतो. या लोकांनी वास्तव भूमिकेला सामोरं जायला हवं होतं. शरद पवारांनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिला, त्यामुळे आता मतदारांच्या मनात एक संभ्रम निर्माण झाला आहे.