Maharashtra News : मोदींनी कोट्यवधी लोकांना आळशी केलंय; फुकटात धान्य देणं म्हणजे विकास नाही
Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी खोटे बोलायची सवय सोडून दिली पाहिजे. मागच्या १० वर्षांत विकास वगैरे काही झालेला नाही. देशातील ८० कोटी लोकांना महिन्याला ५ किलो धान्य फुकटात देणे म्हणजे विकास नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली.
तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊनही मोदी बदलायला तयार नाहीत. त्यांचे फेकणे सुरूच आहे, असा टोलाही सामनातून लगावण्यात आला.
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी राज्यसभेत जोरदार भाषण केलं. या भाषणातून त्यांनी मागच्या १० वर्षात देशाचा मोठा विकास झाल्याचं सांगितलं. त्याचबरोबर देशातील ८० कोटी लोकांना आम्ही प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत धान्य वाटप केल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
त्यांच्या याच भाषणाचा सामना अग्रलेखातून समाचार घेण्यात आला. “पंतप्रधानपदावर तीन वेळा बसलेल्या व्यक्तीने निदान देशाला भ्रमित करण्याची, खोटे बोलण्याची सवय तरी सोडून दिली पाहिजे. पण मोदींचे फेकणे सुरूच आहे. राज्यसभेतील त्यांचे बुधवारचे भाषण हा फेकाफेकीचा उत्तम नमुना आहे”, अशी टीका सामना अग्रलेखातून (Shivsena News) करण्यात आली.
“मागच्या १० वर्षांत विकास वगैरे काही झालेला नाही. देशातील ८० कोटी लोकांना महिन्याला माणशी पाचेक किलो धान्य फुकटात देणे याला मोदी विकास मानत असतील तर ते देशाला फसवत आहेत. राज्यसभेतील एक सदस्य मनोज झा यांनी सांगितले, ग्रामीण भागात आता मजूर मिळत नाहीत. लोकांना घरबसल्या फुकट धान्य मिळते. त्यामुळे लोक आळशी होत आहेत”.
“मजूर मिळत नसल्याने कामे रखडली आहेत. मोदी व त्यांच्या सरकारने गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली कोटय़वधी लोकांना घरबसे व आळशी केले. घरी बसा व फुकटात धान्य घ्या, त्या बदल्यात आम्हाला मते द्या, अशी मोदी यांची भूमिका दिसते. मोदी यांनी त्यांच्या भाषणात जे पतंग उडवले तेदेखील नेहमीचेच होते. तीच दारू, तीच बाटली, बाकी काय?”,असा घणाघातही सामना अग्रलेखातून लगावण्यात आला.
“मोदी यांनी भ्रष्टाचार निपटून काढण्याचा जुनाच नारा दिला आहे. पण मागच्या दहा वर्षांत ईडी, सीबीआयने फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच धाडी घातल्या आहेत. यापैकी काही प्रमुख ‘आरोपी’ भाजपात गेले तेव्हा त्यांना अभय मिळाले व कारवाया थांबल्या, हे खरे नाही काय? अजित पवार, अशोक चव्हाण यांच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचारावर हल्ला करणारे हेच मोदी होते”, अशी टीकाही सामना अग्रलेखातून करण्यात आली.