मराठा विरुद्ध ओबीसी मुद्द्यावर होणारी निवडणूक हा बीड लोकसभेचा इतिहास आहे. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होणार अशी चिन्हं आहेत. निमित्त ठरलंय पंकजा मुंडे-मनोज जरांगेंची विधानं..
उपोषण करुन आरक्षण मिळणार नाही, असं विधान पंकजांनी केलं.. त्यावरुन पंकजांचा रोख कुणाकडे याची चर्चा सुरु झाली.
पंकजांच्या या विधानानंतर जरांगे-पाटील चांगलेच संतापले. पंकजांनी कुणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख आपल्याकडेच असल्याचं समजून जरांगेंनीही मग पंकजांना थेट इशारा दिला.
जरांगेंच्या संतापानंतर पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण
जरांगेंच्या संतापानंतर पंकजांनी स्पष्टीकरण देत आपण जरांगे पाटलांवर टीकाच केली नसल्याचं पंकजांनी म्हटलं. मनोज जरांगे पाटलांवर आपण टीका केलीच नसल्याचं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले. कुणीतरी आगाऊपणा केल्याचं त्या म्हणाल्या…वंचितांसाठी लढणा-यावर टीका आपण करूच शकत नाही…गेलं वर्षभर जरांगेंवर बोलले नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. कायद्यानं आरक्षण मिळणार उपोषण करून आरक्षण मिळत नसतं असं विधान पंकजा मुंडेंनी एका सभेत केलं होतं. त्याला जरांगेंनीही उत्तर दिलं होते.
पंकजा मुंडे आणि मनोज जरांगेंच्या विधानामुळे बीडच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री झाल्याचं बोललं जातंय. पंकजा मुंडेंचं विधान मराठा आरक्षणाशी संबंधित असल्यानं पहिल्यांदाच उघडउघडपणे मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री झाल्याची चर्चा आहे. मराठा आरक्षण, मराठा आणि ओबीसी समाज यांच्या दृष्टीनं बीड का महत्त्वाचा राहिलाय.
बीडमधला मराठा-ओबीसी फॅक्टर
बीडमध्ये मराठा समाजासह ओबीसी समाजाची संख्या लक्षणीय आहे. बीडमध्ये सुमारे 8 लाख मराठा समाज आहे. मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा मोठा प्रभाव बीडमध्ये पाहायाला मिळाला. मराठा आंदोलनानंतर हा समाज पूर्वीपेक्षा अधिक एकवटल्याचं चित्र आहे. 2009 पासून बीडमध्ये मराठा-ओबीसी फॅक्टर निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिलाय. 2009 पासून राष्ट्रवादी काँग्रेसनं बीडमध्ये मराठा उमेदवार दिलाय तर भाजपकडून ओबीसी उमेदवाराला तिकीट देण्यात आले. माळी, धनगर, वंजारी या भाजपच्या ‘माधव’ फॉर्म्युल्याचा प्रयोग बीडमध्ये यशस्वी झालेला दिसला. मराठा-ओबीसी फॅक्टर साधारण दोन दशकं बीड लोकसभेत पॉवरफुल राहिलाय. मात्र उघडउघडपणे हा फॅक्टर यापूर्वी प्रचारात दिसलेला नव्हता. यंदा मात्र पहिल्यांदाच उघडपणे या फॅक्टरची चर्चा होत आहे.