जळगावमहत्वाचेशिक्षण

राज्यातील सर्व जाती-धर्माच्या मुलींना मोफत उच्च शिक्षण – चंद्रकांत पाटील


जळगाव : राज्यातील सर्व जाती-धर्माच्या मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यात येणार आहे. जून 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. जवळपास 800 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र विभागाचे आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी ते बोलत होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू एस. इंगळे उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: संवेदनशील असल्याने परभणीतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर त्यांनी मुलींच्या शुल्कमाफीविषयी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी अशा विविध प्रकारच्या सध्याच्या 642 आणि नव्याने सुरू होणार्‍या 200 अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रात एकाही विद्यार्थिनीला शुल्क भरावे लागणार नाही. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला स्थापनेनंतर शिक्षकांची नवीन पदे मंजूर झाली नाहीत. ही परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन दिलेले प्रस्ताव आणि त्यांची स्थिती याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आश्वासन दिले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यात राज्य प्रथम स्थानी

गेल्या दीड वर्षात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. या धोरणात प्रात्यक्षिकावर अधिक भर देण्यात आला आहे. इंटर्नशिप बंधनकारक आहे. अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयात इंटर्नशिपचा अनुभव घेऊ शकतील. या धोरणात 70 टक्के अभ्यासक्रम हा विषयाशी निगडित असला, तरी 30 टक्के अभ्यासक्रम हा व्यक्तिमत्त्व विकासाला पूरक ठरणारा असल्याचे पाटील म्हणाले.

वागळेंनी नीट बोलावे

वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शुक्रवारी पुण्यात हल्ला करण्यात आला. यावर पंतप्रधानांबाबत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलले, तर त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या माणसांकडून प्रतिक्रिया उमटणे हे स्वाभाविक आहे. हा संताप लक्षात घेऊन वागळेंनी नीट बोलावे, असा सल्लाही पाटील यांनी दिला.

राज्यातील गुन्हेगारीच्या घटना चिंताजनकच

नाशिक येथील कार्यक्रमात बोलताना राज्यात घडणार्‍या गुन्हेगारी घटना चिंताजनकच असल्याची कबुली देत राज्य सरकार त्याबाबत सतर्क असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. अन्न, नागरी व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना आलेल्या धमकीबाबत दखल घेण्यासाठी सरकार सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात सध्या जे चाललेय, ते अनाकलनीय आहे. कुठे तरी सर्व पक्षांनी शांतपणे याचा विचार करणे आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *