महाराष्ट्रमुंबई

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ बायोपिकमधून महेश मांजरेकरांनी घेतली माघार; रणदीप ठरला कारण


मुंबई : अभिनेता रणदीप हुडा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’या चित्रपटात मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणदीप दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी खुलासा केला की, रणदीपच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आधी ते करणार होते. मात्र रणदीपने त्याच बरीच ढवळाढवळ केल्याने मांजरेकर यांनी तो चित्रपट सोडला. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या बायोपिकच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर वेगळ्या दृष्टीकोनातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदना निकोबार द्विपसमूहातील विविध ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग पार पडणार आहे.

“स्क्रिप्टमध्ये रणदीपची ढवळाढवळ”

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी सांगितलं, “व्यक्तिरेखेबद्दल त्याने केलेलं संशोधन पासून मी सुरुवातीला प्रभावित झालो होतो. मी रणदीपला भेटलो आणि तो खूप हुशार असल्याचं मला समजलं. चित्रपटाचा नेमका विषय त्याला समजला होता. आम्ही दोन-तीन वेळा भेटलो. स्वातंत्र्याचा संघर्ष, विश्वयुद्ध यांसारख्या विषयांवरील पुस्तकं त्याने वाचली होती. मी जेव्हा स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्ट त्याच्यासमोर वाचून दाखवला, तेव्हा त्यात त्याला काही समस्या होत्या. तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण सेकंड ड्राफ्टच्या वेळीही तिला समस्या होत्या. तेव्हा मी त्याला म्हटलं की, जर हे असंच होणार असेल तर चित्रपट बनवताना अडचणी येऊ शकतात. तेव्हा त्याने मला आश्वासन दिलं होतं की एकदा का स्क्रिप्टचं काम पूर्ण झालं की तो माझ्या कामात अडथळे आणणार नाही.”

चित्रपटाचा संपूर्ण स्क्रिप्ट तयार झाल्यानंतरही रणदीपची ढवळाढवळ सुरूच होती, असं मांजरेकरांनी पुढे सांगितलं. “रणदीपला हिटलरच्या काही गोष्टी, इंग्लंडचा राजा, इंग्लंडचे पंतप्रधान यांच्याविषयीच्या काही गोष्टी त्यात अपेक्षित होत्या. याविषयी आमच्यात मतभेद निर्माण झाले. चित्रपटातील बदलांबद्दल रणदीप खूप आग्रही होता. इतकंच काय तर नंतर जेव्हा शूटिंगला सुरुवात झाली, तेव्हा तो तिथेही ढवळाढवळ करत होता. तेव्हा मला जाणवलं की, आता हा मला चित्रपट कसं बनवायचं हेसुद्धा शिकवणार का? मी माझ्या पद्धतीने चित्रपटाचं दिग्दर्शन करणार, हे रणदीपसमोर स्पष्ट केलं होतं. पण तो मला मोकळेपणे काम करू देत नसल्याचं माझ्या लक्षात आलं. मी निर्मात्यांना भेटलो आणि त्यांना याबद्दल सांगितलं. एकतर मी किंवा रणदीप या चित्रपटावर काम करू शकतो. कदाचित आता त्यांना त्यांच्या निर्णयाविषयी पश्चात्ताप होत असेल”, असं ते म्हणाले.

उत्कर्ष नैथानीसोबत मिळून रणदीप हुडा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि सहलेखन केलं आहे. रणदीप आणि निर्माता संदीप सिंग यां दोघांनीही कथेच्या कॉपीराइटवर त्यांच्या मालकीचा दावा केल्यामुळे चित्रपटाला सध्या कायदेशीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *