‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर, तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहू नगरीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकर्यांची मांदियाळी जमते. यंदाही शनिवारपासूनच देहू नगरीत शेकडोच्या संख्येने वारकरी दाखल झाले होते. आज सकाळी इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान करून वारकऱ्यांनी तुकोबांचे दर्शन घेतलं. पहाटे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, हर्षवर्धन पाटील, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, यांच्या उपस्थितीत ही पूजा झाली.
रविवारी पहाटेपासून घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती, भाविकांच्या महापूजा असे धार्मिक कार्यक्रम परंपरेने होतील. श्रींच्या चल पादुकांवर पूजा, भाविकांसाठी श्रींचे समाधीचे दर्शन होईल. त्यानंतर कीर्तन सेवा आणि श्रींचा गाभारा स्वच्छता केला जाईल. तसेच समाधीवर जलाभिषेक, श्रींचा महानैवेद्य होईल.
श्रींच्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी दोन वाजता मंदिरात सोहळ्यातील निमंत्रित दिंड्यांचा हरिनाम गजरात प्रवेश होईल. यात रथ पुढील आणि मागील अशा ४७ दिंड्यांतील प्रत्येकी ७५ भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. प्रस्थान सोहळ्यास परंपरेप्रमाणे चार वाजताच्या सुमारास सुरुवात होईल. यात श्री गुरु हैबतबाबा यांच्या वतीने आणि आळंदी देवस्थानच्या वतीने श्रींची आरती होऊन प्रमुख मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप होईल. वीणा मंडपात व्यापारी तरुण मंडळ आणि माऊली ग्रुपने फुलांनी सजवलेल्या पालखीत श्रींच्या पादुकांची वेदमंत्रांच्या जयघोषात प्राणप्रतिष्ठा होईल.