नागपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेकदिन सोहळ्यानिमित्त नागपुरातील महाल परिसरातील शिवाजी चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शिवाजींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक आणि आरती करण्यात आली.
याप्रसंगी नागपुरातील श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांसोबतच नागपुरातील 30 ढोलताशा पथकांची एकत्रित मानवंदना आकर्षणाचे केंद्र होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर महानगर घोष पथकाकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी सायंकाळी वादन करण्यात आले. मोहन भागवत यांच्या हस्ते शिवरायाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, राजे मुधोजी भोसले, महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन, जिल्हाधिकारी विपीन ईटनकर, शहराध्यक्ष आमदार प्रवीण टदके, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तेरावे विक्रमसिंह राजे मोहीते यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे शुक्रवारी सकाळी 7 वाजता शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली. पालखीमध्ये ढोलताशा पथक, ध्वजधारी, शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिक करणारी मुले सहभागी झाली होती. सकाळी 8 वाजता दुग्धाभिषेका नंतर पूजन, माल्यार्पण, आरती करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता नागपुरातील 30 ढोलताशा पथकांचे एकत्रित महावादन झाले. सकाळी 9 वाजता नागपुरातील 4 आखाड्यांनी एकत्र येऊन चित्तथरारक शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिके सादर केली. सकाळी 10 वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.