“त्या रात्री जे झालं ते पुन्हा नाही होऊ शकत”, पाकविरूद्धच्या ऐतिहासिक खेळीबाबत विराटचा मोठा खुलासा
ट्वेंटी-२० विश्वचषक २०२२च्या आपल्या सलामीच्या सामन्यात विराट कोहलीने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध ऐतिहासिक खेळी केली होती.
याच खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानच्या तोंडचा घास हिरावून विजयी सलामी दिली होती. आता किंग कोहलीनं या खेळीबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्यावेळी मी एका वेगळ्याच स्थितीत असल्याचं विराटनं म्हटलं आहे. कोहलीच्या म्हणण्यानुसार, ब्रेकदरम्यान संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड मैदानात आले होते. तेव्हा द्रविड यांनी कोहलीला काहीतरी सांगितले होते, जे विराटला आठवत देखील नाही.
दरम्यान, विराटनं पाकिस्तानविरूद्ध शानदार खेळी करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. अवघ्या ३१ धावांवर ४ गडी बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी नोंदवून सामन्याचा निकाल बदलला. पांड्या आणि कोहली यांनी पाचव्या बळीसाठी ११३ धावा जोडल्या. विराटनं केवळ ५३ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावांची खेळी केली आणि अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
त्या रात्री झालं ते पुन्हा होऊ शकत नाही – विराट
अलीकडेच पार पडलेल्या एका कार्यक्रमात किंग कोहलीनं आपल्या अविस्मरणीय खेळीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानं म्हटलं, “अनेकजण आता देखील विचारत आहेत की, त्यावेळी तू काय विचार करत होतास आणि तुमचा प्लॅन काय होता. पण माझ्याकडं याचं खरंच उत्तर नाही आहे. कारण तेव्हा मी एवढा दबावात होतो की, १२-१३ या षटकांच्या दरम्यान माझं डोकं पूर्णपणे बंद झालं होतं. मी याधी खूप खराब फॉर्मचा सामना करत होतो आणि त्यानंतर मी आशिया चषकात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे मला वाटलं की विश्वचषक खेळण्यासाठी मी तयार आहे. १० व्या षटकापर्यंत आम्ही ३१ धावांवर ४ गडी गमावले होते. मी अक्षर पटेलला धावबाद केलं होतं आणि स्वत: २५ चेंडूत १२ धावांवर खेळत होतो. मला आठवतंय की ब्रेकमध्ये राहुल भाई माझ्याजवळ आले आणि काहीतरी सांगितले पण मला आठवत नाही की त्यांनी नेमकं काय सांगितलं होतं. मी याबाबद्दल त्यांना देखील सांगितलं आहे. मी सांगितलं की, तुम्ही जे काही सांगितलं ते मला काहीच आठवत नाही. कारण मी त्यावेळी वेगळ्याच स्थितीत गेलो होतो. त्या रात्री जे काही झालं ते पुन्हा होऊ शकत नाही.”