शासनाकडून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या अशा योजना सुरू केल्या जातात. जळगाव जिल्ह्यातही आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलींसाठी सायकल वाटप करण्याची योजना सुरु करण्यात आली आहे.
शाळेपासून पाच किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आठवी ते बारावी वर्गापर्यंतच्या गरजू मुलींसाठी सायकल वाटप केली जाणार आहे. मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत ही योजना राबवली जात आहे.
दरम्यान आता या योजनेअंतर्गत 2022-23 या शैक्षणिक वर्षात 4651 सायकल देण्याचा दुसऱ्या टप्प्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शासनाकडे पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावाला आता मान्यता मिळाली असून शासनाकडून जिल्हा परिषदेला शाळकरी गरजू मुलींना सायकल वाटप करण्यासाठी दोन कोटी 32 लाख 95 हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पात्र मुलींना मोफत सायकल वाटपासाठी २ कोटी ३२ लाख ९५ हजार रुपयांच्या निधीची मागणी माध्यमिक शिक्षण विभागाने शासनाकडे केली होती. ही मागणी शासनाने मान्य केली आहे. आता हा निधी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्यानंतर तालुका स्तरावर वितरित होईल आणि तालुका स्तरावरून हा निधी थेट संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जाणार आहे.
मग मुख्याध्यापक संबंधित पात्र विद्यार्थिनीला हा निधी देऊ करणार आहेत. येत्या आठवड्यात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत यापूर्वीही जिल्ह्यात एकूण 517 सायकलचे वाटप झाले आहे. खरं पाहता ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुलींना शाळेत जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना एक तर खाजगी वाहनाने जावे लागते किंवा पायी चालत शाळेत जावे लागते.
निश्चितच शाळकरी विद्यार्थिनींना यामुळे मोठ्या त्रासाला समोर जावे लागते. अशा परिस्थितीत शासनाने पाच किलोमीटर अंतरापर्यंत शाळेत पायी जाणाऱ्या मुलींसाठी ही योजना सुरू केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेअंतर्गत सायकल खरेदीसाठी पाच हजार रुपये अनुदान गरजू विद्यार्थिनीला दिले जाणार आहे. हे अनुदान पात्र विद्यार्थिनीला एकूण दोन टप्प्यात मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात विद्यार्थिनीला साडेतीन हजार रुपये दिले जातात त्यानंतर सायकल खरेदीची पावती दाखवल्यानंतर दीड हजार रुपये संबंधित विद्यार्थिनीला मिळत असतात. विशेष म्हणजे ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात पोहोच होत असते.
यापूर्वी फक्त साडेतीन हजार रुपये विद्यार्थ्यांना अनुदान मिळत होतं मात्र आता यामध्ये वाढ झाली असून पाच हजाराच अनुदान शाळकरी मुलींना सायकल खरेदीसाठी दिल जात आहे. जिल्ह्यातील चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, बोदवड, अमळनेर, मुक्ताईनगर, जामनेर या तालुक्यातील विद्यार्थिनींना हा निधी मिळणार आहे.