महागाव : गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांच्या निशाण्यावर आलेल्या महागाव तालुक्यात मंगळवारी भरदुपारी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला.बंदूकधारी दरोडेखोरांनी पैशाची बॅग घेऊन पोबारा केला. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास तालुक्यातील खडका येथे घडली.
खडका येथे नव्यानेच किसनराव देशमुख यांचे दत्ता पेट्रोलियम सुरू झाले आहे. या पेट्रोल पंपावर मंगळवारी दुपारी तीन युवक बंदूक घेऊन आले. त्यांनी आपल्या वाहनात पेट्रोलही भरुन घेतले; मात्र पंपावरील कर्मचाऱ्याने त्यांना पैशाची मागणी केली असता त्याला बंदूकचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रकमेची बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर हे दरोडेखोर आपल्या वाहनाने पसार झाले. सदर बॅगमध्ये ५० हजार रुपयांची रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी नाकाबंदी सुरू केली आहे. दरोडा टाकून पळालेले आरोपी महागाव शहराच्या दिशेने पसार झाल्याचे सांगितले जात आहे.
महागाव शहरात आणि तालुक्यात गेल्या वर्षभरापासून धाडसी चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. महागाव शहरातून गेेलेल्या महामार्गावरील चक्क एटीएम मशीनच चोरट्यांनी उचलून नेल्याची घटना ताजी असताना पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याने खळबळ उडाली.
खेड्यात देशीकट्टे पोहोचल्याने चिंता
– शहरातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडे अग्नीशस्त्र सापडत होते. आता हे अग्नीशस्त्र ग्रामीण भागातही सर्रास वापरले जात आहे. जिल्ह्यात परप्रांतातूनच देशीकट्टा आयात केला जातो. राऊंडही मिळविले जातात. २५ ते ३० हजारात सहज हे शस्त्र उपलब्ध होत आहे. यामुळे पोलिसांचे टेंशन वाढले आहे. छोट्या, मोठ्या गुन्ह्यात निघणारे शस्त्र आले कोठून याच्या मुळापर्यंत आजतागायत पोलीस पोहोचलेले नाही.
जागोजागी नाकाबंदी
– या प्रकरणात पेट्रोल पंपाचे मालक किसनराव देशमुख यांनी महागाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चोरटे महागाव शहराच्या दिशेने पळाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी जागोजागी नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे.
व्यापाऱ्यांमध्ये पसरले दहशतीचे वातावरण
– भरदिवसा व्यापाऱ्यांना लुटण्याच्या घटना तालुक्यात वाढत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याची प्रतिक्रिया व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी व्यक्त केले. लुटमार वाढत असताना एकाही दरोडेखोराला तत्काळ अटक झाल्याचे दिसत नाही. व्यापाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटण्याआधीच पोलिसांनी दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली.