Navgan News



Add Space

ताज्या बातम्याशेत-शिवार

तीन एकरांतील केळीवर फिरविला ट्रॅक्टर; ३ लाख खर्च करूनही शेतकऱ्याच्या पदरी निराशा!

Spread the love

केळीला अपेक्षित दर मिळत नसताना वाहतुकीच्या खर्चाचाही प्रश्न निर्माण झाल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने तीन एकरांतील पाच हजार केळीची झाडे ट्रॅक्टरच्या साह्याने काढून टाकली.

रवींद्र मेटकर असे या शेतकऱ्याचे नाव असून, अमरावतीजवळील अंजनगाव बारी शिवारातील ही घटना आहे.

लागवड, ठिबक आणि अन्य बाबींवर तीन लाख रुपयांहून अधिक खर्च करूनही उत्पादनातून परतावा मिळण्याची शक्यता मावळल्याने त्यांच्यावर उभ्या पिकावरच नांगर फिरविण्याची वेळ आल्याचे ते खिन्नपणे सांगतात.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी परिसर केळी लागवड आणि उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागात केळीच्या दरावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. व्यापारी कमी दराने केळी खरेदी करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असून, या प्रकरणात बाजार समितीने हस्तक्षेप करून न्याय्य दर मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. या परिस्थितीचा फटका आता दूरच्या बाजारपेठांवर अवलंबून असलेल्या केळी उत्पादकांनाही बसत आहे.

अंजनगाव सुर्जीपासून सुमारे ८८ किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनगाव बारी येथील शेतकरी रवींद्र मेटकर यांनी जुलै २०२५ मध्ये तीन एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली होती. त्यांनी २५ रुपये प्रतिरोप याप्रमाणे पाच हजार रोपे खरेदी केली. लागवड, ठिबक सिंचन आणि अन्य आनुषंगिक बाबींसाठी मिळून प्रतिरोप सुमारे ६० रुपये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार एकरी सुमारे एक लाख रुपये आणि तीन एकरांसाठी तीन लाख रुपयांहून अधिक भांडवल त्यांनी या पिकात गुंतविले.

मात्र पीक तयार झाल्यानंतर अपेक्षित दर मिळण्याऐवजी व्यापाऱ्यांकडून अवघ्या चार ते पाच रुपये प्रतिकिलो दराने केळी खरेदीची मागणी करण्यात आली. त्यातच अमरावतीपासून जवळपास ८८ किलोमीटर अंतरावरून केळीची वाहतूक करण्याचा खर्च कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीबाबत असहकाराची भूमिका घेतली. कमी दर आणि वाहतुकीचा खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने उत्पादन विकूनही खर्च भरून निघण्याची आशा मेटकर यांना उरली नाही.

पीक वाढविण्यासाठी केलेली मेहनत, त्यावर खर्च केलेले लाखो रुपये आणि उत्पादनातून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा या सगळ्यांवर पाणी फेरले गेले. अखेर आर्थिक नुकसान सहन करत मेटकर यांनी तीन एकरांतील संपूर्ण पाच हजार केळीची झाडे काढून टाकण्याचा निर्णय घेतला. ट्रॅक्टरच्या साह्याने उभे पीक हटविण्यात आले. बाजारपेठेत योग्य दर न मिळणे आणि वाहतुकीच्या खर्चाचा प्रश्न यामुळे शेतकऱ्याला उत्पादन घेऊनही पीक सोडून देण्याची वेळ आल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.