Navgan News

ताज्या बातम्या

दूध आहे की विष? जामखेड १२०० लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त, महाराष्ट्रात खळबळ…


Fake milk chemicals seized : काही थेंब केमिकलचे अन् दूध तयार! पोलिसांकडून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त; झिरवळ अन् फडणवीसांचे खाते आमने-सामने?

मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे असलेल्या अन्न व औषध प्रशासनाचा कारभार ‘लाच’ प्रकरणामुळे चर्चेत आहे. यातच अहिल्यानगर पोलिसांनी जामखेड इथं मोठ्याप्रमाणात दूध बनवणारे केमिकलचा साठा जप्त करत या विभागाच्या अहिल्यानगरमधील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

 

How fake milk is made using chemicals : जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे सुरू असलेल्या दूध भेसळीच्या जीवघेण्या उद्योगावर अन्न व औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या धाड टाकत भेसळीचा भांडाफोड केला आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निर्दयपणे खेळणाऱ्या या टोळीचा काळाकुट्ट कारभार उघडकीस आला आहे. या कारवाईत तब्बल 200 लिटर क्षमतेचे 6 ड्रम असा एकूण 1200 लिटर फॅट वाढविणारे घातक लिक्विड आणि रासायनिक पावडर जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे, अवघ्या 200 लिटरच्या लिक्विडच्या एका ड्रममधून तब्बल 2 ते अडीच हजार लिटर भेसळयुक्त दूध तयार केले जाऊ शकते, अशी प्राथमिक माहिती समोर आली असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 2 लाख 80 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

दुधातील फॅट कृत्रिमरीत्या फुगवण्यासाठी पैराफिन ऑइल आणि कृत्रिम फ्लेवरयुक्त द्रव तसेच विशिष्ट रासायनिक पावडरचा वापर केला जात होता. घटनास्थळीच अधिकाऱ्यांनी डेमो सादर करून या भेसळीची पद्धत उघडकीस आणली. या रसायनांचा मानवी शरीरावर गंभीर व दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतो, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

या भेसळ प्रकरणात दूध व्यवसायिक रामदास उबाळे याच्यासह समीर शेख आणि आफताब शेख यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तिघांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जामखेडमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे दूध व्यवसायातील भेसळीचे भीषण वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, या काळ्या साम्राज्याची मुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा सखोल तपास आता सुरू झाला आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *