
पती दारू पिऊन घरी आला. त्यानंतर पती आणि पत्नीमध्ये चांगलाच वाद झाला. पत्नीने रागाच्या भरात पतीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पण नको तिकडे मार लागल्यामुळे जे घडले त्यामुळे संपूर्ण अंबाजोगाईमध्ये खळबळ माजली. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया…
नेमकं काय घडलं?
ही घटना अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागात घडली. कैलास हा दारू पिऊन घरी आल्यावर त्याचे पत्नी मायासोबत वाद झाले. मायाने संतापाच्या भरात कैलासला खाली पाडून पोटावर व अवघड जागी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरच्यांनी व शेजाऱ्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता मायाने हस्तक्षेप करू नका, दररोज हा दारु पिवुन असाच करतो मी याला फुकट सांभाळायचे का? असे म्हणत त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने कैलास घराशेजारी बेशुद्ध पडलेला दिसला.
डॉक्टरांनी मृत घोषित केले
नातेवाईकांनी त्याला ऑटोरिक्षाने सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरुवातीला मृत्यू दारूच्या अतिसेवनामुळे झाला असा समज होता. मात्र दुसऱ्या दिवशी 11 सप्टेंबर रोजी झालेल्या शवविच्छेदन अहवालात कैलासचा मृत्यू मारहाणीत अवघड जागी झालेल्या गंभीर दुखापतींमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. कैलासची बहिण ज्योती तरकसेने पोलिसात जाऊन वहिनीविरोधात तक्रार दाखल केली.
सात वर्षांपूर्वी झाले होते लग्न
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, कैलास सरवदे याचे लग्न सात वर्षांपूर्वी माया हिच्याशी झाले होते. माया हिचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पतीपासून तिला दोन मुली तर कैलासपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कैलास हा शरीराने अपंग आणि दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने त्याच्यात व माया यांच्यात नेहमी वाद होत असत. माया ही कैलास याला नेहमी उपाशी ठेवत असे. कैलास याची पत्नी माया सरवदे हिने जाणूनबुजून पतीवर घातक मारहाण करून त्याचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप फिर्यादीतून करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माया सरवदे हिच्यावर बीएनएस कलम 105 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 


 





