
बीड : बीड जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वडिलांच्या आत्महत्येनंतर दोन दिवसांनी तीन वर्षीय चिमुकलीला गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जवळील इमामपूर रोड परिसरातून जयराम बोराडे आणि त्यांची तीन वर्षीय मुलगी 9 सप्टेंबर रोजी घरातून बाहेर पडले होते. त्यामुळे घरच्यांकडून त्यांचा शोध घेतला जात आहेत. मात्र जयराम बोराडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. यानंतर पोलिसांकडून तीन वर्षीय चिमुकलीचा शोध सुरू होता.
मात्र आज (11 सप्टेंबर) सकाळी बीड तालुक्यातील रामगड परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणांना बेपत्ता झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. वडिलांच्या आत्महत्येनंतर चिमुकलीचा अशा अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
चिमुकलीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. परंतु, जयराम बोराडे यांनी आत्महत्या का केली? आणि तीन वर्षीय चिमुकलीला गळफास का दिला? तसेच या दोन्ही घटना नेमक्या कारणाने घडल्या, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. धक्कादायक म्हणजे गेल्या काही दिवसात बीडमधून अशा अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर आत्महत्येचं कोडं सोडवण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.