
आचार्य चाणक्य हे केवळ राजकारणाचे गाढे अभ्यासक नव्हते. तर ते दूरदृष्टी असलेले नीतिशास्त्रज्ञही होते. त्यांचे विचार, त्यांची धोरणे आजच्या काळातही दररोजच्या जीवनात लागू होतात.
अनेकदा आपण बोलण्याच्या नादात समोरच्या व्यक्तीला सर्वकाही सांगून टाकतो.
परंतु आयुष्यातील तीन गोष्टी कधीच कोणाला सांगू नयेत, असं चाणक्य म्हणाले होते. या गोष्टींमुळे समोरची व्यक्ती तुमचा सर्वांत चांगला मित्र असला तरी तो शत्रू बनू शकतो, असं ते म्हणाले.
चाणक्य नीतीनुसार, तुम्ही तुमचा पैसा कुठून येतो आणि किती येतो हे कधीही कोणालाही सांगू नये. कारण जेव्हा संपत्तीची खरी माहिती उघड होते, तेव्हा लोक तुलना करू लागतात. तिथूनच मत्सर, लोभ निर्माण होतो आणि कट रचले जातात. बऱ्याचदा यामुळे नातेवाईक आणि मित्रसुद्ध दुरावले जातात. त्यामुळे संपत्तीचा स्रोत आणि रक्कम नेहमी गुप्त ठेवा, असं चाणक्य म्हणाले.
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असे काही क्षण येतात, जेव्हा त्याला कमकुवत किंवा अपमानित झाल्याचं जाणवतं. परंतु या क्षणांविषयी इतरांना सांगू नका, असं चाणक्य नीती म्हणते. तुम्ही तुमच्या आयुष्यातल कमकुवत क्षण इतरांची सहानुभूत मिळवण्यासाठी सांगाल, परंतु त्याच गोष्टीचा वापर कधी शस्त्र बनवून तुमच्याविरोधात केला जाईल, याची खात्री नाही. समोरची व्यक्ती मित्र असला तरी परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, असं ते म्हणतात.
तिसरी गोष्ट म्हणजे, तुमच्या भविष्यातील योजना, प्लॅन्स किंवा पुढचं पाऊल याविषयी कोणासमोर खुलासा करू नका. कारण त्यात अडथळे आणि अडचणी निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न होतील. जे लोक शांतपणे आपलं काम करतात, त्यांनाच यश मिळतं, असं चाणक्य सांगतात.