म्हसळा तालुक्यात असणाऱ्या आंबेतच्या घाटातील ‘ती’ रात्र ! रस्ताभर सारखी-सारखी तीच-तीच माणसं …

रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यात आंबेतचे घाट आहे. कोकणातील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील लोकांसाठी हा घाट काही नवीन नाही. मुळात, रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करताना हा घाट उतरावा लागतो मग सावित्री नदीवरील आंबेत पुलावरून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करता येते.
.
मंडणगड आणि दापोली तालुक्यात जाणाऱ्या गाड्या या घाटातूनच जातात. या घाटाविषयी वेगळीच भीती येथील स्थानिकांच्या मनात आहे. येथील भयाण रात्र आणि काळोखाची शुकशुकाट कुणालाही थरथरी आणेल. येथील नागमोडी वळणं वर्षभरात काही अपघात घडवून आणतेच. अशा अनेक भयाण घटना येथे घडलेल्या आहेत, जे ऐकून अंगातून घामाच्या धारा सुटल्याशिवाय राहत नाहीत. अशीच एक घटना घडली मंडणगड तालुक्यात राहणाऱ्या रोहिणी जाधव आणि त्यांच्या कुटुंबासोबत.
काही कारणास्तव रोहिणी आणि तिचा कुटुंब भररात्री मंडणगडहुन मुंबईच्या दिशेने रवाना होतो. मंडणगडहुन आंबेटचा घाट तीस मिनिटांच्या अंतरावर असेल… बघता बघता गाडी आंबेतच पूल पार करते. रत्नागिरीच्या हद्दीतून निघून गाडी रायगड जिल्ह्याच्या मातीत पोहचते. पुढे अंधाराचा थरार सुरु होतो. कोकणातील रात्र तर प्रत्येकालाच ठाऊक असेल. आंबेत गाव सोडला की आंबेटचा घाट सुरु होतो. नागमोडी वळणांनी भरलेल्या या घाटात गाडी पाऊल ठेवते. घाटाच्या वर गाडी पोहचताच रोहिणी यांच्या भावाला (चालकाला), रोहिणी यांच्या नवऱ्याला आणि स्वतः रोहिणीला रस्त्याच्या शेजारी दूरवर एक कुटुंब उभे दिसते. प्रचंड काळोख,
एक बाजू घनदाट झाडांनी वेढलेली तर दुसऱ्या बाजूला खोल दरी… मध्यरात्री जवळजवळ दीड वाजले आहेत आणि हे कुटुंब इतक्या घनदाट जंगलात, ते ही घाटाच्या माथ्यवर जे गावापासून खूपच लांब आहे. इथे नक्की करत काय आहे? असा प्रश्न यांच्या मनात आला. पण काळवेळ ठीक वाटत नव्हती. आपल्यासोबत आपली दीड वर्षांची लेक आहे, त्यामुळे रोहिणी भावाला म्हणते ‘सुदेश, गाडी थांबवू नकोस… मला हे काही ठीक वाटत नाही.’ बंधूही ताईच्या सांगण्यावरून गाडी थांबवत नाही. रस्त्याच्या शेजारी लिफ्ट मागणारे ते कुटुंब मागे टाकून गाडी सुसाट पुढे जाते. मिनिटाभरात पुन्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तोच कुटुंब… तीच कृती करताना त्या गाडीत बसलेल्या लोकांना दिसून येतो. यावेळी त्यांना तर विश्वासच बसतो की ही पांढऱ्या केसांची म्हातारी, तिचा मुलगा , तिची सून आणि तिची दोन नातवंड काही साधीसुधी माणसं नसून या घाटात भटकणारी भुतं आहेत.
चालक सुदेश हे प्रसंग पाहून घाबरतो पण रोहिणीचे बालपण गावीच गेले असल्याने तिला या गोष्टी ठाऊक होत्या, तिने सुदेशला धीर देत गाडीवर नियंत्रण ठेवत त्या कुटुंबाकडे न पाहता पुढे जात राहायला सांगितले. यावेळीही मागच्या वेळेप्रमाणे त्या कुटुंबाला मागे सारत गाडी सुसाट पुढे जाते. पण पुन्हा अचानक तोच प्रसंग घडतो. मिनिटांभरात तोच कुटुंब आणि तीच माणसं रस्त्याच्या दुसऱ्याबाजूला यांच्या गाडीला हात दाखवताना दिसून येतात. यावेळीही गाडी काही थांवली जात नाही. असाच प्रसंग आणखीन दोनवेळा अगदी घाट उतरेपर्यंत सारखासारखा घडत असतो. एकदाका आंबेटचा घाट उतरला की त्यांच्यासोबत घडणाऱ्या या गोष्टी थांबतात.
या घटनेला अनेक वर्ष उलटून गेली पण येथून जाताना रोहिणी आणि त्यांचे कुटुंब अजूनही त्या विचारात असतात की त्यांना ते कुटुंब पुन्हा दिसले तर… मुळात, या घटनेतून एक शिकण्यासारखे आहे की नियंत्रण असणे किती महत्वाचे आहे. आपल्यामध्ये नियंत्रण असेल तर नक्कीच सगळ्या अडचणी अगदी सोप्या होऊन जातात.
(टीप: ही बातमी सत्य घटनेवर आधारित असून यातील पात्रांची नावे काल्पनिक आहेत.)
अस्वीकरण : आरोग्य, सौंदर्य काळजी, आयुर्वेद, योग, धर्म, ज्योतिष, वास्तु, इतिहास, पुराण इत्यादी विषयांवर स्टारमनीमध्ये प्रकाशित/प्रसारित होणारे व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ सार्वजनिक हित लक्षात घेऊन तुमच्या माहितीसाठी आहेत. स्टारमनी याची सत्यता पुष्टी करत नाही. कोणताही प्रयोग करण्यापूर्वी, कृपया तज्ञांचा सल्ला घ्या. अस्वीकरण पहा !