
भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुळजापूर दौऱ्यावर आहे. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान असलेल्या तुळजाभवानी मातेचं दर्शन घेणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दौऱ्यानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी टायमिंग साधत शेतकरी कर्जमाफीवरून डिवचलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा जुना व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत, तुळजाभवानी मातेच्या पवित्र दरबारातून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी कैलास पाटील यांनी केली आहे.
कैलास पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजाभवानी मातेच्या पवित्र दरबारातून शेतकऱ्यांच्या (Farmer) संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती”.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणेची आठवण करून देताना, मुख्यमंत्री फडणवीसांचा (Devendra Fadnavis) प्रचारातील जुना व्हिडिओ काढून आमदार कैलास पाटील यांनी त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केला आहे. आमदार पाटील यांनी साधलेल्या या टायमिंगवरून तुळजापूरच्या भाजपसह महायुतीच्या कार्यकर्ते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.
धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील जनतेने कर्जमाफीच्या आपल्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या पदरी भरभरून यश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळून कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी कैलास पाटील यांनी केली.
शेतकऱ्याविषयी आपले खरे प्रेम असेल, तर आपणच केलेल्या घोषणेवर अंमलबजावणी करण्यासाठी वाट कसली पाहताय? असा सवाल देखील आमदार कैलास पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.