वडिलांचा एन्काऊंटर, तिघे सख्खे भाऊ कुख्यात गुंड; आठवले गँगचा म्होरक्या ‘सनी भैय्या’ आहे तरी कोण?
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर (Santosh Deshmukh Murder Case) बीडची गुन्हेगारी हा चर्चेचा विषय बनला आहे. हीच गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आता बीड पोलीस अॅक्शन (Beed Crime News) मोडमध्ये असून मोठ्या कारवाया करत आहे.
वाल्मिक कराड गँगनंतर आता दहशत माजवणाऱ्या आठवले गँगवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आठवले गँगवर पोलिसांनी मकोका लावला आहे. त्यानंतर आता गँगचा म्होरक्या सनी आठवले चर्चेत आला आहे. सनी आठवले कोण आहे याविषयी आपण जाणून घेऊया.
बीडमधील कुख्यात गुंड म्हणून सनी आठवलेची ओळख आहे. खंडणी, मारहाण, बनावट नोटा छापण्याचा आणि हत्येचा प्रयत्न अशा विविध गंभीर गुन्ह्यात तो सध्या फरार आहे. मारहाण करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, गोळीबार, गावठी पिस्तूल बाळगणे अशा प्रकारच्या गंभीर घटनांचे गुन्हे यापूर्वीही आठवले गँगवर दाखल आहेत. महत्त्वाचे म्हणजे अक्षय आठवले, सनी आठवले आणि आशिष आठवले हे तिघे सख्खे भाऊ या गँगमध्ये आहेत. या तीन भावांवर अनेक गुन्हे आहेत. सनी आठवले सध्या फरार आहे.
सनी आठवलेवर देशद्रोहाचा गुन्हा
डिसेंबर महिन्यात जुन्या वादातून अक्षय आठवले गँगने बदनामी झाल्याच्या रागातून घरात घुसून गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सनी आठवले हा फरार आहे. बनावट नोटा तयार करून चलनात आणल्याच्या प्रकरणी सनी आठवलेवर देशद्रोहाच्या कलमाखाली गुन्हा नोंद झालेला आहे. आठवलेचे राजकीय नेत्यांशी देखील संबध आहे. आठवले आधी वाल्मिक कराडसोबतच काम करत होता. तो दिपज्योत ग्रुपचा संस्थापक अध्यक्षही आहे. याच ग्रुपच्या माध्यमातून त्याची धनंजय मुंडे यांच्याशीही जवळीक वाढली. मात्र काही कारणाने त्यांच्यात वाद झाले आणि त्यानंतर आठवले आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे गेला.
आठवलेच्या वडिलांचा झाला होता एन्काऊंटर
आठवले आणि बंधू हे हे 2014 साली एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या शामराव आठवले यांची मुले आहेत. शामराव आठवलेवर अपहरणाचा गुन्हा होता.सनी आठवले सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत .सनीच्या सोशल मीडियावर त्याने अनेक नेत्यांसोबतचे फोटो अपलोड केले आहेत. एवढच नाही तर त्याने काही जेलमधील फोटो देखील अपलोड केले आहे. किंग ऑफ बीड सिटी, सनी भैय्या, बीड जिल्ह्याचे आदरणीय वडील, अशी अनेक नावे सनी आठवलेला आहेत.
सनीची ऑडिओ क्लिप व्हायरल
सनी आठवले यानं या पोस्टबरोबर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये वाल्मिक कराडने डोक्यात राग ठेवत कशा पद्धतीने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले हे सांगितले आहे. बीडमध्ये नेमकं चाललंय काय? का मला गुंतविलं जातंय? खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत? देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त केलं जातंय? देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे वाल्मिक अण्णा कराड यांचे मित्र असून मी धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेले होतो. परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत तीन ते चार वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मिक अण्णा कराड यांना माझा राग आल्यानं सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतविण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना दिले होते. त्यावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी लागलीच कलम 107 मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलावले होते. मी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलवण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो राग मनामध्ये धरून आणि अण्णांच्या सांगण्यावरून बनावट नोटा छापाईच्या प्रकरणांमध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आले आहे.